अस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर
By Admin | Updated: March 18, 2015 00:42 IST2015-03-18T00:42:48+5:302015-03-18T00:42:48+5:30
जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे.

अस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर
दाभा : जवळपास मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरूवात होते, परंतु सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ही उन्हाळ्याची सुरूवात आहे की, पावसाळ्याची सुरूवात आहे, असा प्रश्न पडत आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे जनजीवन बिकट झाले आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून, एकवेळ उपासी राहून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे घासच जणू निसर्ग हिसकावून घेत आहे. जिल्ह्यात गहू, चना, लाखोरी, मिरची, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व राजकीय पुढारी पाठीवर मारतात असे दृश्य आहे.
बालपणी वर्गात गुरूजी ‘निसर्ग कोपला तर’ या विषयांवर निबंध लिहून घ्यायचे. ते फक्त शाळा व पेपर पुरली मर्यादित होते. मात्र त्याची प्रत्यक्ष चाहूल सध्या अनुभवायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसापासून निसर्गाची प्रकृती बिघडली असून त्याचा प्राकृतिक परिणाम जनतेवर होत आहे. (वार्ताहर)
आरोग्यावर परिणाम
वातावरणातील बदलामुळे विषाणुजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, पडसे, ताप, पाठदुखी आदी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. सध्या राज्यात आधीच स्वाईन फ्लू या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या वातावरणाचा मानवी जीवनावर मोठा बिकट परिणाम होत आहे.
भाजीपाला महागला
निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती आलेला भाजीपाला वाया जात आहे. सध्या ग्रामीण भागात मिरची, भेंडीचा तोडा मोठ्या प्रमाणात सुरू असून असेच पाऊस पडत राहिले तर मिरची व भेंडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी चिंता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. ऐन तोडणीच्या वेळी पावसाने भाजीपाला खराब झाल्याने व बाजारामध्ये भाजीपाला पुरवठा कमी झाल्याने परिणामी भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दिवसा उन्हाळा सायंकाळी पावसाळा असा चित्र सध्या सुरू असून जणू निसर्गाचा लपंडावच सुरू आहे.
मदतीची अपेक्षा
निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे कृषि विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन तोडणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर दिवसेंदिवस वाढल्याने शेतकरी आत्महत्येचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात सत्ताधारी एकाच पक्षाचे असल्याने त्यांनी मोठ्या मनाने शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच अच्छे दिन आयेंगे या त्यांच्या ब्रीदवाक्याची सत्यता जनतेला कळून येईल.