Again two people positive | पुन्हा दोन व्यक्ती पॉझिटिव्ह

पुन्हा दोन व्यक्ती पॉझिटिव्ह

ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या २६ : जिल्हा प्रशासन जोमाने लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गुरूवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्यात दोन रुग्णांची भर पडली. एकंदरीत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २६ झाली आहे. गत तीन दिवसात आठ रुग्णांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील एक तर पवनी तालुक्यातील एक असे दोघांचे नमुने शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. गत दोन आठवड्यापासून जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दृश्य आहे. विशेष म्हणजे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांपैकीच कोरोना रुग्ण आढळून येत आहे.
भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये शुक्रवारपर्यंत ४१ व्यक्ती भरती असून आतापर्यंत २९० व्यक्तींना या वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग, होस्टेल भंडारा क्वारंटाईनमध्ये २१ व्यक्ती भरती आहेत.
साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये २४५ व्यक्ती असे एकूण २६६ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत १११७ व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे फ्ल्यु ओपीडी सुरू करण्यात आली असून त्यामध्ये श्वासदाहाचे एकूण १४४ व्यक्ती भरती आहे. यासर्वही व्यक्तींचे घशातील नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १४२ नमूने निगेटिव्ह आहे. एक अहवाल अजुनही अप्राप्त आहे. जिल्ह्याच्या सीमावर नऊ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून या पोस्टवर वैद्यकीय पथकही नेमण्यात आले आहे.
गावपातळीवर घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र श्वासदाहक रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य प्रशासनाला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९१ हजार ४९३ नागरिकांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्याचा लाभही नागरिक घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले.

जिल्ह्यात आले ३८ हजार ९७२ व्यक्ती
पुणे, मुंबई व इतर राज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ९७२ व्यक्ती आले आहेत. यापैकी २६ हजार ३८३ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच पुणे, मुंबई व इतर राज्यातून आलेल्यांपैकी १२ हजार ५८९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांना घरा बाहेर निघू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे.
गुरूवारी ९९ व्यक्तींच्या घश्यातील नमूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले होते. आतापर्यंत नागपूर येथे १६५२ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १४६२ नमूने निगेटिव्ह आले आहे. २६ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत पाठविलेल्या एकूण नमुन्यांपैकी १६४ जणांचे अहवाल अप्राप्त आहे.

Web Title: Again two people positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.