दाेन महिन्यानंतर जिल्ह्यात काेराेना मृत्युसंख्या निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST2021-05-22T04:33:18+5:302021-05-22T04:33:18+5:30
भंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्याला शुक्रवारी माेठा दिलासा मिळाला. तब्बल दाेन महिन्यानंतर मृत्युसंख्या ...

दाेन महिन्यानंतर जिल्ह्यात काेराेना मृत्युसंख्या निरंक
भंडारा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक आणि मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्याला शुक्रवारी माेठा दिलासा मिळाला. तब्बल दाेन महिन्यानंतर मृत्युसंख्या शून्यावर आली तर २११ व्यक्ती काेराेनामुक्त झाले. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी हाेत असून शुक्रवारी केवळ ८४ व्यक्ती बाधित आढळून आले.
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ३८ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात तर मृत्यूचे तांडव सुरू हाेते. गिराेला घाटावर अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत हाेती. सर्वाधिक मृत्यू जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत झालेत. दरराेज वाढते मृत्यू पाहून नागरिक भयभीत झाले हाेते. अशा परिस्थितीत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. त्यासाेबतच मृत्यूही कमी हाेऊ लागले. शुक्रवारी जिल्ह्यात कुठेही मृत्यूची नाेंद झाली नाही.
शुक्रवारी १४२१ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात २०, माेहाडी ०३, तुमसर ०४, पवनी १३, लाखनी २१, साकाेली १७, लाखांदूर ०६ अशा ८४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८०० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी ५५ हजार ३६४ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १३९८ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढत असून शुक्रवारी ९५.७९ टक्के नाेंद घेण्यात आली. तर मृत्युदर १.८० टक्के नाेंदविण्यात आला.
जिल्ह्यात १३९८ ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात ४८९, माेहाडी ८३, तुमसर १३३, पवनी १०६, लाखनी २१२, साकाेली २७०, लाखांदूर १०५ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत भंडारा तालुक्यात २३ हजार ३३६ व्यक्ती काेराेनामुक्त झाले असून माेहाडी ४०८३, तुमसर ६७३३, पवनी ५७२३, लाखनी ६११९, साकाेली ६६८९ आणि लाखांदूर तालुक्यात २६८१ रुग्ण आहेत.
दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात
भंडारा जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून आले हाेते. मात्र दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ८०० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून शहरी भागातील ३९४ तर ग्रामीण भागातील ३४ हजार ४०६ रुग्णांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात मात्र उलट स्थिती असून भंडारा शहरात १४ हजार ९०१ काेराेना रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात ९०४ रुग्ण आढळून आलेत.
शहरी भागात ४०४ तर ग्रामीणमध्ये ६३४ मृत्यू
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे आतापर्यंत १०३८ बळी गेले आहेत. त्यात शहरी भागात ४०४ तर ग्रामीण भागात ६३४ व्यक्तींचा समावेश आहे. मृतांमध्ये पुरुषांची संख्या ७४८ असून २९० महिलांचा काेराेनाने बळी घेतला.