कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कंडक्टर महिलेला रेतीच्या ट्रॅक्टरची धडक; अपघातानंतर चालक पसार
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 23, 2025 16:21 IST2025-05-23T16:19:03+5:302025-05-23T16:21:04+5:30
नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर अपघात, उपचारासाठी भंडाऱ्यात जाण्याचा सल्ला

कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कंडक्टर महिलेला रेतीच्या ट्रॅक्टरची धडक; अपघातानंतर चालक पसार
तुमसर: भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या एसटी कंडक्टर महिला भरधाव रेतीच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाली. या महिलेला सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत नेवून नंतर ट्रॅक्टरसह चालक अपघात स्थळावरून पसार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजता नवेगाव-एलोरा पेपर मिल रस्त्यावर घडला. ममता पेशने (४५, नवेगाव मनोरा, ता. तिरोडा) असे महिलेचे नाव आहे.
ममता पेशने या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एसटी महामंडळाच्या डेपोत चालक व वाहक पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता आपल्या दुचाकीने तिरोडा येथे कर्तव्यावर जाण्यास निघाल्या असता, या मार्गावरून भरधाव जाणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. यामुळे त्या दुचाकीसह रस्त्यावर पडल्या. ट्रॅक्टरने त्यांना सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती ममता पेशने यांच्या पतीला दिली. त्यांनी नागिरकांच्या सहाय्याने उपचाराकरिता भंडारा येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
वर्षभरापूर्वी सेवेत रूजू
ममता पेशने या सध्या तिरोडा बस डेपोत वाहक पदावर कार्यरत आहेत. मागील दीड वर्षांपूर्वी त्या नोकरीवर लागल्या. त्या एक उत्तम चालकही असल्याची माहिती आहे. वेळप्रसंगी दोन्ही कर्तव्य त्या पार पडतात, अशी माहिती तुमसर येथील उपआगार व्यवस्थापक रचना मस्करे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रेती चोरीचा फटका
मनोरा नवेगाव ते एलोरादरम्यान मोठ्या प्रमाणात रेती चोरी आणि अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी काठावरून ही रेती चोरी केली जाते. ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवतात. त्याच्या फटका स्थानिक नागरिकांना बसतो. काहीप्रसंगी ही अवैध वाहतूक नागरिकांच्या जीवावरही उठत आहे.