ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात निघाला महामोर्चा,जिल्हाभरातून उसळली अफाट गर्दी
By युवराज गोमास | Updated: March 22, 2026 19:21 IST2026-03-22T19:20:44+5:302026-03-22T19:21:21+5:30
OBC March In Bhandara: जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी एकता जिंदाबाद, उठ ओबीसी जागा हो, आंदोलनाचा धागा हो, आदी दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत दसरा मैदानावरून सकल ओबीसी महामोर्चाच्या नेतृत्वात ओबीसींचा भव्य महामोर्चा निघाला. दूरवरील गावखेड्यातील नागरिकांसमवेत विविध शहरांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

ओबीसी जनगणनेसाठी भंडाऱ्यात निघाला महामोर्चा,जिल्हाभरातून उसळली अफाट गर्दी
- युवराज गोमासे
भंडारा - जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी एकता जिंदाबाद, उठ ओबीसी जागा हो, आंदोलनाचा धागा हो, आदी दणाणून सोडणाऱ्या घोषणा देत दसरा मैदानावरून सकल ओबीसी महामोर्चाच्या नेतृत्वात ओबीसींचा भव्य महामोर्चा निघाला. दूरवरील गावखेड्यातील नागरिकांसमवेत विविध शहरांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महिलांसह वृद्ध, तरूण-तरूणीही रखरखत्या उन्हात हाती फलक व गळ्यात पिवळा दुपट्टा घालून एकतेचा व समतेचा आवाज उंचावतांना दिसल्या. प्रत्येकाच्या तोंडी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, युजीसी समता विधेयक लागू करा, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे, हा नारा होता.
सकाळी ११ वाजता दसरा मैदानावरून निघालेला मोर्चा गांधी चौक-पोस्ट ऑफीस चौकाने मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रीमूर्ती चौकात धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मंचावरील ओबीसी संघटनांच्या पुढाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी विरोधी धोरणांचा खरपूस घेतला. सत्ताधारी रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे असून, यांचा डीएनए कधीच ओबीसींचा नव्हता व राहणार नाही, अशी टिका केली. हे सरकार कुत्र्यांची व गाढवांची प्रगणना करते, परंतु ओबीसींची करीत नाही. ओबीसींची मुले शिक्षणापासून वंचित राहून गुलामीत व गुरढोर राखीत शेतातच मरावे, अशी विकृत मानसिकता राज्यकर्त्यांची असल्याचा प्रहार यावेळी करण्यात आला. ओबीसींनो, एक कायम लक्षात ठेवा जे ओबीसींना सहकार्य करतात, त्यांनाच निवडणुकीत सहकार्य करा, असे जाहीर आवाहन करण्यात आले.
जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
ओबीसी जनगणना होत नसेल तर संपूर्ण समाजाने जनगणनेवर बहिष्कार घालावे, घरी आलेल्या प्रगणकास माहिती देवू नये, असे जाहिर आवाहन याप्रसंगी करण्यात आले. देशात ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्केपेक्षा अधिक असतांना जाणीवपूर्वक तुटपूंजा निधी मंजूर केला जातो. त्यामुळे ओबीसींची जनगणना होत नाही, तोपर्यंत ओबीसींचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार एकमताने जाहीर करण्यात आला. लवकरच आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मंचावर यांची उपस्थिती
मंचावर सकल ओबीसी महामोर्चाचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, भगिरथ धोटे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, रमेश शहारे, रोशन उरकुडे, उमेश कोर्राम, गोपाल सेलोकर, जयंत झोडे, मंगला वाडिभस्मे, ललीता देशमुख, रोशन जांभुळकर, उमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, संजय आजबले, सुरेश खंगार यांची उपस्थिती होती
या लोकप्रतिनिधींचा होता शेवटपर्यंत सहभाग
सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने यावेळी मंचावर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नाही. हातात ओबीसींचा झेंडा व डोक्यावर पिवळी टोपी परिधान करीत ओबीसी योद्धांसारखे विरोधी पक्षनेते आ. विजय वेडेट्टीवार, आ. नाना पटोले, आ. अभिजीत वंजारी, माजी आ. चरण वाघमारे, सभापती नरेश ईश्वरकर आदी लाेकप्रतिनिधी नागरिकांत ठाण मांडून शेवटपर्यंत बसले.