लाखांदूर अन्नपुरवठा विभागाच्या गोडावूनमधील ९ हजार क्विंटल तांदळाला बुरशी; जबाबदार कोण? कुणावर होणार कारवाई ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:18 IST2025-12-25T20:16:42+5:302025-12-25T20:18:22+5:30
Bhandara : सीएमआरअंतर्गत अन्नपुरवठा विभागाच्या भाड्याने असलेल्या गोदामातीत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतो; मात्र देखरेख न केल्याने लाखांदूर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोडावूनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाला बुरशी लागली.

9,000 quintals of rice in the food supply department's warehouse in Lakhandur is moldy; Who is responsible? Who will be taken action against?
रवींद्र चन्नेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : सीएमआरअंतर्गत अन्नपुरवठा विभागाच्या भाड्याने असलेल्या गोदामातीत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतो; मात्र देखरेख न केल्याने लाखांदूर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोडावूनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाला बुरशी लागली. त्यामुळे या तांदळाचे पीठ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तहसील कार्यालय अन्नपुरवठा विभागामार्फत सीएमआरअंतर्गत नागपूर जिल्ह्याला अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांना तांदूळ पुरवठा केला जातो. मागील सहा महिन्यांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विभागाने भाडेतत्त्वावर गोदाम घेऊन तांदूळ साठविले होते. अंदाजे नऊ हजार क्विंटल धान्याचा हा साठा होता. त्याची नासाडी झाल्याचे चित्र दिसून आले.
या गोदामातील तांदळाची उचल न झाल्यामुळे त्या तांदळाला बुरशी धरली असून पीठ निर्माण झाले आहे. त्या गोदामाची स्थिती तांदूळ साठविण्यायोग्य नसतानाही त्या ठिकाणी साठवणूक करण्यात आली. पावसाळ्यात गोदामाला गळती झाल्याने तांदूळ खराब झाला. तांदूळ बाहेरजिल्ह्यांना पाठवायचा होता; मात्र त्याची गुणवत्ताच खराब झाल्याचे दिसून आल्याने हा तांदूळ स्वीकारला नसल्याची माहिती आहे.
गोरगरिबांना दर्जेदार तांदूळ देण्यात यावा, यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतो. मात्र अन्नपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नऊ हजार क्विंटल तांदळाला पुन्हा चाळणी लावण्याची व पॉलिश करण्याची वेळ आली आहे. त्याची भरपाई अन्नपुरवठा विभाग करून देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय गोदामांचे बांधकाम केले असून अनेक दिवसांपासून ती गोदामे रिकामी आहेत; तर काहींचे काम चालू आहे. मात्र जो तांदूळ गोरगरिबांना वाटण्यात येतो, तो साठवून ठेवण्यास योग्य नसलेल्या गोदामात ठेवण्यात आला.
गोदामाची दुर्दशा तरीही केली साठवणूक
हा खराब झालेला तांदूळ चाळणी व पॉलिश करण्यासाठी ट्रकद्वारे राइस मिलमध्ये पाठविणे सुरू झाले आहे. विशेष म्हणजे अन्नपुरवठा विभागाच्या गोदामाची दुर्दशा झाली असताना, त्या ठिकाणी तांदूळ कसा काय साठविण्यात आला, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
"गोदामाला पावसाळ्यात गळती लागल्याने तांदूळ पाण्यात भिजला. त्यामुळे तो खराब झाला. त्याची उचल न झाल्यामुळे तो परत करण्यात आला. आता खराब झालेल्या तांदळाला चाळणी, पॉलिश करून पुन्हा तो नागपूर जिल्ह्याला पाठवण्यात येईल. यानंतर नवीन शासकीय गोदामात तांदळाची साठवणूक केली जाईल."
- धीरज मेश्राम, अन्नपुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, लाखांदूर.