९५ हजारांची चोरी; चार तासांत चोरटा गजाआड
By Admin | Updated: February 27, 2015 00:29 IST2015-02-27T00:29:20+5:302015-02-27T00:29:20+5:30
राईस मिलमधून ९५ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या राईस मिलमधील मजुराला ग्रामीण कारधा पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली.

९५ हजारांची चोरी; चार तासांत चोरटा गजाआड
भंडारा : राईस मिलमधून ९५ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या राईस मिलमधील मजुराला ग्रामीण कारधा पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार खंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालगाव येथे तिरूपती राईस मिल चेतिराम हटवार रा. मानेगाव/बाजार यांच्या मालकीची आहे. या राईस मिलचे संपूर्ण आर्थिक व्यवहार हटवार यांचा भाचा दिनेश रेवतकर पाहतात. १७ फेबु्रवारी रोजी महाशिवरात्रीनिमीत्त त्यांनी मिलमधील सर्व मजुरांना सुटी दिली व सकाळी सर्व मजुरांच्या उपस्थितीत मिलला कुलूप लावून यात्रेसाठी निघून गेले. रात्री यात्रेवरून परत आल्यानंतर दिनेश रेवतकर हे मिलमध्ये आले असता त्यांना मिलचे शटर तुटून उघडलेले दिसले. तसेच मिलमध्ये असलेली ९५ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच याची तक्र ार ग्रामीण पोलिसात केली.
पोलिसांनी तातडीने पालगाव येथे जाऊन मिलची पाहणी केली. त्यानंतर मिलमध्ये कामावर असलेल्या मजुरांची माहिती घेतली. पोलिसांच्या श्वानपथकाने पचखेडी गावाचा मार्ग दाखविला. त्यानंतर पोलिसांनी पचखेडी येथील मजुरांच्या घराची झडती घेतली. परंतु, पहिल्या मजुराच्या घरी काहीच आढळले नाही. त्यानंतर दुसरा मजूर देवदास धोटे याच्या घराच्या झडतीदरम्यान, त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी आपला हिसका दाखविताच त्याने कपाटात लपवून ठेवलेले ७० हजार रुपये पोलिसांना काढून दिले. त्यानंतर त्याला ठाण्यात आणून चौकशी केली असता दुसऱ्या दिवशी लपवून ठेवलेले आणखी २५ हजार रुपये आणून दिले.
पोलिसांनी चोरीची रक्कम जप्त केली व आरोपी देवदास धोटे याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ग्रामीणचे प्रभारी ठाणेदार खंडारे, पोलीस शिपाई कुकडे व पथकाने या चोरीचा छडा अवघ्या चार तासात लावला. (नगर प्रतिनिधी)