११६ कोटींमधून होणार ८६ गावांचा कायापालट
By Admin | Updated: March 4, 2015 00:55 IST2015-03-04T00:55:50+5:302015-03-04T00:55:50+5:30
आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर

११६ कोटींमधून होणार ८६ गावांचा कायापालट
जलयुक्त शिवार अभियान : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
भंडारा : आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर सिंचन क्षेत्रात वाढ व इतर उद्देश हाती घेण्यात आले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून जिल्हयातील ८६ गावांमधील दुष्काळे परिस्थिती निवारणासाठी ११६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईग्रस्त गावांना मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानातून पावसाचे पाणी गावशिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करुन विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमतेची नविन कामे हाती घेणे, वृक्ष लागवडील प्रोत्साहन अशा उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, कृषी, पाटबंधारे, जलसंपदा व सामाजिक वणिकरण विभागामार्फत ही कामे केली जाणार आहे.
भंडारा तालुक्यातील १५, तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी १५, पवनी १२, साकोली १०, लाखनी ९ व लाखांदूर तालुक्यातील ६ अश्या ८६ गावांची निवड करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात संबंधित विभागाकडून ही कामे करण्यासाठी ११६ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत पवनी तालुक्यात ६४९ कामे केली जाणार असून २२ कोटी ४९ लाख २८ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील २६५ कामांसाठी १८ कोटी ९९ लाख ६४ हजार तर तुमसर २८४ कामांसाठी १७ कोटी ५६ लाख ७१ हजार, मोहाडी २६२ कामासांठी १५ कोटी ५ लाख ८४ हजार, साकोली ४८९ कामांसाठी १६ कोटी २ लाख ३५ हजार, लाखनी ३१७ कामांसाठी १८ कोटी ७७ लाख ८५ हजारांचा निधी उपलब्ध होणार आहे. लाखांदूर ३३८ कामांसाठी ७ कोटी २० लाख ७७ हजारांची तरतुद करण्यात आली आहे. ११६ कोटी २१ लाख ४४ हजार निधीतून जिल्हयातील ८६ गावात २६०४ कामे हाती घेतली जाईल. अभियानांतर्गत कृषी विभागाला ११२७ कामासांठी २८ कोटी ३९ लाख ३२ हजारांचा तर ग्राम पंचायतस्तरावर ८३३ कामांसाठी ४१ कोटी ३३ लाख ६९ हजारांचा निधी दिला जाईल. ७ कोटी ३३ लाख २१ हजारांच्या निधीतून वन विभागाला ३७८ कामे तर ३२ कोटी ९३ लाख ८४ हजारातून लघू पाटबंधारे विभागाला २२८ कामे करावयाची आहेत. जलसंपदा विभागाला १ कोटी ४८ लाख ५० हजारातून १० कामे व सामाजिक वनिकरण विभागाला १ कोटी ४० लाख २६ हजारातून २० कामे करावयाची आहेत. (शहर प्रतिनिधी)