66% water in projects | प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणी
प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणी

ठळक मुद्देसरासरी ८६ टक्के पाऊस : मालगुजारी तलावांच्या पातळीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील मध्यम, लघु व माजी मालगुजारी तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी प्रथम पावसाने हुलकावणी दिल्यानंतर मध्यंतरी दमदार पाऊस बरसल्याने प्रकल्पांची स्थिती सुधारली आहे.
जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ६५.२२ टक्के जलसाठा आहे. चांदपूर मध्यम प्रकल्पात ८४.१६, बघेडा जलाशयात ५७.७२, बेटेकर बोथली येथे ७.३१ तर सोरणा या प्रकल्पात १२.७४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बेटेकर व सोरणा प्रकल्पाच्या पातळीत सुधारणा झालेली नाही. एकुण ३१ लघु प्रकल्पापैकी सहा प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यात तुमसर तालुक्यातील डोंगरला, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, भंडारा तालुक्यातील मंडनगाव व पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, पिलांद्री तर लाखनी तालुक्यातील वाकल या लघु प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील एकुण लघु प्रकल्पात ६२.६२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. यापैकी एकोडी, आमगाव, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सीतेपार, सानगडी, रेंगेपार कोहळी, पिंपळगाव, चप्राड, इंदोरा, दहेगाव या मालगुजारी तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सरासरी ८६ टक्के पाऊस बरसला असून अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या काळात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.

Web Title: 66% water in projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.