भंडाऱ्यातील ४८८ तरूण वैद्यकीय चाचणीसाठी पात्र
By Admin | Updated: January 10, 2016 00:40 IST2016-01-10T00:40:20+5:302016-01-10T00:40:20+5:30
भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती होत आहे. विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी असलेल्या सैन्य भरती ...

भंडाऱ्यातील ४८८ तरूण वैद्यकीय चाचणीसाठी पात्र
भंडारा : भंडारा जिल्ह्यात कधी नव्हे ती पहिल्यांदा खुली सैनिक भरती होत आहे. विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी असलेल्या सैन्य भरती कार्यक्रमानुसार शुक्रवारला भंडारा जिल्ह्यातील तरूणांची भरती घेण्यात आली. यासाठी ५,१४१ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ३,९५३ तरूण रॅलीत सहभागी झाले. यामधून ४८८ उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंतच्या चाचणीत पात्र ठरलेली ही संख्या सर्वाधिक आहे.
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी धावण्याच्या चाचणीसाठी तयार असलेल्या चमुला झेंडी दाखविली. जिल्ह्यातील तरुणांना या रॅलीचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्याचा निश्चितच फायदा झाल्याचे दिसत होते.
भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदा सैन्य भरती घेण्यात येत असल्यामुळे त्याचा लाभ भंडारा जिल्ह्यातील तरूणांना होत आहे. भविष्यात सैन्यात भंडारा जिल्ह्यातील तरूणांना संधी मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या गौरवात भर पडणार आहे. कारण हे सैनिक बनून देशाची सेवा करणार आहेत.
सहभागी झालेल्या ३,९५३ उमेदवारांपैकी कागदपत्रांची पुर्तता करणारे २,९४५ उमेदवार धावण्याच्या चाचणीमध्ये पात्र ठरले. या चाचणीमधून उद्या होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी ४८८ उमेदवार पात्र ठरले आहेत. उद्या रविवारला नागपूर जिल्ह्यासाठी सैन्य भरती होणार आहे. या रॅलीत सहभागी झालेल्या उमेदवारांची एवढया मोठया प्रमाणात पात्र होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे कर्नल महेंद्रकुमार जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)