शिक्षण विभागाकडून ३२२ शाळा ‘दत्तक’
By Admin | Updated: December 16, 2015 00:35 IST2015-12-16T00:35:50+5:302015-12-16T00:35:50+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेचा विकास साधता यावा,...

शिक्षण विभागाकडून ३२२ शाळा ‘दत्तक’
प्रगत शैक्षणिक धोरण शाळांना मिळणार १७ हजार ५०० रूपयांचे अनुदान
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेचा विकास साधता यावा, यासाठी राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळांना दत्तक घेण्याची नवोपक्रम योजना अंमलात आणली आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ३२२ शाळांना दत्तक घेतले आहे.
या नवोपक्रम योजनेत २०० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १०१ माध्यमिक शाळा अशा ३०१ शाळा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांनी दत्तक घेतल्या आहेत. तर २१ जिल्हा परिषद शाळा शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी दत्तक घेतल्या असून जिल्ह्यातील ३२२ शाळा दत्तक घेवून तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे.
इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटच्या संस्कृतीमूळे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आता पुढाकार घेतला आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्ह्यातील शाळांना दत्तक घेवून तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, या शाळांची निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवे उपक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. या नव्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची प्रगती साधताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
केआरआयचे निर्देश
भरती प्रक्रिया परीक्षा सीईटी मार्फत करावी, शिक्षक व मुलांची हजेरी २०१६ पर्यंत बायोमॅट्रीक पध्दतीने करणे, मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण ५ टक्केवर आणणे, स्वच्छतागृह व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, असर पध्दतीत राज्य देशात प्रथम तीनमध्ये आणणे, विद्यार्थ्यांच्या वस्तूनिष्ठ चाचण्या घेणे, शाळांच्या मनमानी कारभारांना आळा घालने, शाळांच्या प्रतवारीसाठी सॅक स्थापन करणे.
असा राहील प्रगत कार्यक्रम
नवोपक्रमात निवड झालेल्या शाळांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक शाळांना १७ हजार ५०० रूपये अनुदान देणार आहे. मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, शाळेची रंगरंगोटी, शिक्षकांना मार्गदर्शन, अप्रगत विद्यार्थ्यांचा गट तयार करून प्रगत विद्यार्थ्यांना त्यातील विद्यार्थी दत्तक देणार आहे.
तर शाळा ठरेल ‘रोल मॉडेल’
प्रगत शैक्षणिक योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यात येईल. कृतीशिल अध्ययन व शैक्षणिक निर्मितीवर भर देऊन विद्यार्थ्यांची प्रगती करणे. ज्ञानरचना प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे ज्ञान वृध्दींगत करण्यावर भर राहणार आहे. विद्यार्थ्यांचा विकास साधून परिसरातील शाळांसाठी ही शाळा रोल मॉडेल ठरणार आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी शासनाने या नवोपक्रमाची अंमलबाजवणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३०२ शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शाळेतील सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेवून उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.
- के. झेड. शेंडे,
शिक्षणाधिकारी (माध्य.) भंडारा