३१ लाखांची सुगंधित सुपारी जप्त
By Admin | Updated: July 21, 2014 23:41 IST2014-07-21T23:41:56+5:302014-07-21T23:41:56+5:30
जिल्ह्यातील पानठेल्यावर सुगंधी पानसुपारी व तंबाखुजन्य पदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ३० लक्ष ९४ हजार रूपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई सन २०१३-१४ या सत्रात करण्यात आली.

३१ लाखांची सुगंधित सुपारी जप्त
भंडारा : जिल्ह्यातील पानठेल्यावर सुगंधी पानसुपारी व तंबाखुजन्य पदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ३० लक्ष ९४ हजार रूपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई सन २०१३-१४ या सत्रात करण्यात आली. या आशयाची माहिती संबंधित विभागाचे सहायक उपायुक्त तथा अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर नंदनवार यांनी आज आयोजित वार्ताहर परिषदेत दिली.
नंदनवार म्हणाले, अन्न व औषधी प्रशासनाच्या उद्दिष्टानुसार तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर कायद्यांतर्गत बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितावर कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.
सन २०१३-१४ मध्ये ४५३ पानठेला चालकावर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून ३१ लाखांचा साहित्यसाठा जप्त करण्यात आला. यात बंदी असतानाही सदर तंबाखुजन्य साहित्य विकले जात असल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून २७ प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ आहेत.
अन्न व औषध विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने कारवाईची प्रक्रिया मंदावली असल्याचे सांगून भविष्यात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर नजर असल्याचे सांगितले.
शासनाच्या नवीन दिशानिर्देश
यापूर्वीही संबंधित मंत्रालयाने तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीसंदर्भात वेळोवेळी अद्यादेश व सुचना काढल्या आहेत. मात्र नुकत्याच जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांची खैर करू नका, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. भविष्यात या दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सहायक उपायुक्त नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)