२३,७४२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By Admin | Updated: March 3, 2015 00:29 IST2015-03-03T00:29:36+5:302015-03-03T00:29:36+5:30
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील

२३,७४२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
आजपासून परीक्षा- कॉपीमुक्त अभियानासाठी ४० भरारी पथकाची नियुक्ती
भंडारा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील ३०३ शाळांमधील विद्यार्थी ८८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा देत आहे. परिक्षेसाठी २० हजार ५५६ नियमित विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बैठे पथकांसह ४० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणारी कॉपी व अनुचित कार्यावर करडी नजर ठेवणार आहेत.
विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग दहावीच्या परिक्षेसाठी सज्ज झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षाधिकारी किसन शेंडे म्हणाले, मागील वर्षीप्रमाणे दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहील. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कॉपीमुक्त अभियान यशस्वीतेसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांसाठी २७ भरारी पथकाची आवश्यकता आहे. मात्र, शिक्षण विभाग व दक्षता समितीने ४० भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. पथकात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, राजस्व प्रमुख, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व अन्य ३ सदस्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर बैठे पथकाची चमू स्थापित करण्यात आली आहे. यात तीन जणांची नियुक्ती केली आहे. (शहर प्रतिनिधी)
२३,७४२ विद्यार्थी देणार परीक्षा
जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेसासाठी ८८ परीक्षा केंद्र आहेत. यावर्षी २३,७४२ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. यात २०,५५७ विद्यार्थी नियमित आणि ३,१८५ पूर्नरपरीक्षार्थीचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परिक्षेची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.
दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
या संदर्भात दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत ८८ परीक्षा केंद्रावरील परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थीनींची तपासणी महिला शिक्षकांमार्फत करावी. परीक्षेचे कामकाज करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीशिवाय परीक्षा केंद्रावर इतर व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, यांची काळजी घ्यावी. बैठे पथकांनी परीक्षा कालावधी दरम्यान बसून न राहता परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधी दरम्यान बंद ठेवण्यात यावे. पाणी वाटपासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी. परिक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा गैरप्रकार होऊ नयेत, परीक्षा शांततामय वातावरण व परीक्षार्थ्यांना भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता आली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.