वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 00:50 IST2016-01-07T00:50:39+5:302016-01-07T00:50:39+5:30
भंडाऱ्यात पहिल्यांदाच आयोजित खुली सैनिक भरती वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र ठरले.

वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र
भंडाऱ्यात सैनिक भरतीचा पहिला दिवस : आज यवतमाळ जिल्ह्यातील तरुणांची चाचणी
भंडारा : भंडाऱ्यात पहिल्यांदाच आयोजित खुली सैनिक भरती वैद्यकीय तपासणीसाठी २२५ तरुण पात्र ठरले. विशेष म्हणजे नोंदणीपेक्षा निम्मे उमेदवार सैनिक भरतीसाठी शहरात दाखल झाले. सैन्य भरतीसाठी बुधवारी वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवार पहाटे ३ वाजतापासूनच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उपस्थित झाले होते.
आज पहाटे ५ वाजता प्रथम उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. यानंतर सकाळी ९ वाजतापर्यंत जवळपास वर्धा जिल्ह्यातून ४ हजार ४६५ नोंदणीकृत उमेदवारांपैकी जवळपास १६५० उमेदवारांनी हजेरी लावली.
यात दुपार सत्रापर्यंत सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले होते. चाचणीअंती एकुण उमेदवारांपैकी २२५ उमेदवार गुरुवारी होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरल्याची कर्नल एम.के. जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
७ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील तर ८ ला भंडारा जिल्ह्यातील उमेदवार सैन्य भरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी तरुणांचे जत्थे शहरात ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी)
जमिनीवरच तरुणांनी घेतला आश्रय
सैन्य भरतीसाठी विदर्भातील जिल्ह्यांमधून दररोज तरुणांचे जत्थे शहरात दाखल होणार आहेत. विविध जिल्ह्यातून आलेल्या तरुण उमेदवारांसाठी शहरातील पाच ठिकाणी निवाऱ्याची सोय केली आहे. परंतु या ठिकाणी फक्त खोली असून सुविधा नाहीत. त्यामुळे तरुणांना आसरा घेण्यासाठी जागा मिळाली. परंतु बोचऱ्या थंडीत बसस्थानकातील जमिनीवरच आसरा घ्यावा लागला. शहरातील अन्य दोन ठिकाणी रात्री ११ वाजतापर्यंत संबंधित ठिकाणी कुलूपबंदच होते. संपर्क साधल्यावर ही सभागृहे उमेदवारांसाठी खुली करण्यात आली. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या या तरुण उमेदवारांना जेवणासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत.