भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड : 'त्या' क्षणामुळे आताही येतात अंगावर शहारे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 11:11 AM2023-01-09T11:11:05+5:302023-01-09T11:11:57+5:30

जिल्हा रुग्णालय टाकतोय कात : जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाला दोन वर्षे पूर्ण, अत्याधुनिक सुविधांसाठी होतोय प्रयत्न

2 years of Bhandara District Hospital fire incident; the sound of screaming babies still brings shivering | भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड : 'त्या' क्षणामुळे आताही येतात अंगावर शहारे

भंडारा जिल्हा रुग्णालय जळीतकांड : 'त्या' क्षणामुळे आताही येतात अंगावर शहारे

Next

इंद्रपाल कटकवार

भंडारा : ९ जानेवारीची पहाट आठवली की काळजाचा ठोका चुकतो. बाळांच्या किंचाळण्याचा आवाज आजही अदृश्य स्वरूपात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भिंतींमधून गुंजतोय. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत दहा निष्पाप बाळांचा जीव गेला. त्या काळरात्रातील घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बोध घेतला असून अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे रुग्णालय आता सज्ज होऊ लागले आहे.

मातृत्वाचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीणच. बाळाच्या पहिल्या रडण्याने प्रसूतीच्या अनंत वेदनाही मागे पडतात. चिमुकल्या बाळांचा जीव काय असतो हे एखाद्या मातेला विचारावे. परंतु त्या दुर्दैवी मातांच्या नशिबी ९ जानेवारीची पहाट काळरात्र ठरली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात आग लागली. या आगीत दहा बालकांचा होरपळून व श्वास गुदमरून मृत्यू झाला. चूक कुणाची होती नव्हती याचा उहापोह आजही सुरूच आहे. परंतु या घटनेपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने चांगलाच बोध घेतला.

३६ बेबी वॉर्मर

राख झालेला एसएनसीयू कक्ष आता पुन्हा नव्या दमाने उभारण्यात आला आहे. जवळपास पाच कोटींचा खर्च करून हा कक्ष आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे.

या कक्षात इन्क्युबेटरऐवजी ३६ बेबी वार्मर स्थापित करण्यात आले असून, वेळप्रसंगी ५० नवजात बालकांची येथे सुविधा होऊ शकते. रुग्णालयाच्या नवीन इमारतीत १५ बेडचे अत्याधुनिक आयसीयू कक्ष सुरू झाले असून, त्याचा फायदा रुग्णांना होत आहे.

फायर ऑडिटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

अग्निकांडानंतर पूर्ण जिल्हा रुग्णालयाची सुरक्षाच धोक्यात असल्याची बाब समोर आली होती. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याने हा सर्व प्रकार व त्यानंतर मानवी हस्तक्षेपही तेवढाच जबाबदार असल्याचे समोर आले. अग्निकांडानंतर एसएनसीयू कक्षासह सर्व इमारतींमध्ये फायर एक्स्टिंग्युशर व फायर फायटिंग सिस्टमचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतीत बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक यंत्रणेमार्फत कार्य सुरू आहे. याचे काम पूर्ण होताच नगरपरिषद प्रशासन ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एसएनसीयू कक्ष सीसीटीव्हीच्या नजरेत

अग्निकांड घडले तेव्हा एसएनसीयू कक्ष सोडून अन्य कक्ष व व्हरांड्यात काय होत आहे याची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसायची. परंतु आता जिथे बाळ ‘बेबी वॉर्मर’मध्ये ठेवण्यात येते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या कक्षात २४ तास परिचारिका तैनात करण्यात आल्या आहेत. रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ नये, अशी सक्त ताकीदही परिचारिकांना देण्यात आली आहे. फक्त या कक्षासाठी २८ परिचारिकांची नियुक्ती आहे.

दोन वर्षांपूर्वी घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक होती. या घटनेपासून आरोग्य विभागाने प्रत्येक स्तरावर काळजी घेतली आहे. एसएनसीयू कक्षात २४ तास परिचारिकांची ड्युटी लावण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. फायर ऑडिटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा

Web Title: 2 years of Bhandara District Hospital fire incident; the sound of screaming babies still brings shivering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.