१.४३ लाख रुपयांचा दंड
By Admin | Updated: May 7, 2014 01:44 IST2014-05-07T01:44:49+5:302014-05-07T01:44:49+5:30
पवनी तालुक्यात सर्वच भागातून गौण खनिजाची तस्करी होत असल्याची ओरड आहे.

१.४३ लाख रुपयांचा दंड
वसूल रेतीची चोरी : तहसीलदारांची कारवाई
पवनी : पवनी तालुक्यात सर्वच भागातून गौण खनिजाची तस्करी होत असल्याची ओरड आहे. यात रेतीमाफियाच्या दबंगशाहीने सर्वच हैराण झाले होते. यावर पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी कार्यवाही करीत आहेत. नव्याने आलेले तहसीलदार रूजू होतच रेतीमाफियांवर कार्यवाही करीता पुढाकार घेतला आहे. यात एका महिन्यात १ लाख ४३ हजार रूपयाचे रेतीचे ट्रॅक्टर, ट्रक यांच्याकडून दंड वसूल केला आहे. यात दगड, माती, मुरूम, रेती या गौण उपजांचा समावेश् आहे. प्रशासनाने यावर्षी अनेक घाटाचे लिलाव केले नाही. याचा फायदा घेत रेतीमाफियांना आपला ताबा घेतला आहे. रात्र दिवस रेतीचा उपसा होत असल्यामुळे परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या धुळामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र रेतीमाफियांचा सामना करण्याकरीता प्रशासनाचे कर्मचारीही कमी पडत होते. दगड, माती, मुरूम, रेती या गौण खनीजाची अनेक भागातून खुलेआम वाहतूक होत आहे. यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यावर पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी नेहमी पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. नव्याने आलेले तहसीलदार दिलीप आखाडे, नायब तहसीलदार वाकलेकर तलाठी दिलीप कावरे, दिलीप बागरे, जगदीस सोनपने यांनी ताफा तयार करून रेती चोरी करणार्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू केला आहे. एका महिन्यात १ लाख ४३ हजार दंड वसूल झाल्याने रेतीमाफियांचे धाबे दनानले आहे. तलाठ्यांना सुरक्षिततेची गरज सर्वत्र गौण खनिजाची चोरी होत असल्यामुळे प्रशासनाचा लक्षावधी रूपयाला चुना लागत आहे. ही अवैध चोरी रोखण्यासाठी तलाठ्याकडून प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागातील रेतीमाफियांकडून या कर्मचार्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. मात्र त्यांना प्रशासनाकडून कोणालाही प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)