१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित
By Admin | Updated: October 16, 2014 23:20 IST2014-10-16T23:20:47+5:302014-10-16T23:20:47+5:30
बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. प्रकल्पाची १५ ते २० टक्के

१० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित
तुमसर : बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. प्रकल्पाची १५ ते २० टक्के कामे शिल्लक आहेत. संपूर्ण प्रकल्प (वितरिका) पूर्णत्वाकरिता ७० ते ८० कोटी निधीची गरज आहे. सध्या प्रकल्पात केवळ ५० टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा सारखा हक्क आहे.
बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यातील सितेकसा गावाजवळ असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास येण्याकरिता वितरिका सह, जमीन हस्तांतरण, रेल्वे क्रॉसींगची कामे अपूर्ण आहेत. या संपूर्ण कामाकरिता ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. सन २०१५ च्या शेवटी या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण होतील अशी माहिती आहे. या प्रकल्पातून सन २०१३-१४ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. उन्हाळ्यात २० ते २५ गावांना सिंचनाचा लाभ झाला. सुमारे दोच्न हजार हेक्टर शेतीला पाणी पोहचले. येथे पुन्हा १५ ते २० टक्के वितरिकेची कामे शिल्लक आहेत. वितरिकेला जमीन मिळाली नाही. यात तुमसर, राजापूर, बोरी, कारली, देव्हाडी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, मांढळ, उमरवाडा, नवरगाव, माडगी, बाम्हणी, मांगलीसह काही गावात वितरिकेची कामेच झाली नाही.रेल्वे क्रॉसिंगला मंजुरी मिळाली नाही. जमीन हस्तांतरणाची कामे झाली नाही. सन २०१५ पर्यंत ही कामे होतील अशी माहिती आहे. जमीन हस्तांतरणाकरिता १२ ते १३ कोटी निधीची गरज आहे.शेतकऱ्यांना येथे टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडले जात आहे. २५ टक्केच पाणीसाठा महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याने पाण्याची बचत व योग्य विनियोग कसे करता येईल याचा आराखडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम यांनी तयार केला आहे. प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ कि.मी. लांबीचा आहे. त्यानंतर दोन लघु कालवे दोन दिशेने जातात. यापूर्वी दोन्ही लघु कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत होता.
सध्या एक लघु कालवा सहा दिवस सुरु राहील. तर दुसरा लघुकालवा त्यानंतर सुरु राहील. असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी कालवे फुटली असून त्यांना भगदाड पडले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कालव्यांना पाण्याकरिता भगदाड पडले आहेत.सध्या वितरीकेची कामे बंद असून आॅक्टोबरनंतर ती सुरु होणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)