२०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 09:42 IST2025-01-01T09:41:47+5:302025-01-01T09:42:21+5:30
Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा. स्वामींवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्यावा, असे सांगितले जाते.

२०२५चा पहिला गुरुवार: वर्षभर गुरुबळ हवे? संकल्पाने ‘हा’ एक मंत्र म्हणा, स्वामी कृपा मिळवा
Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: ०२ जानेवारी २०२५ रोजी नववर्षातील पहिला गुरुवार आहे. गुरुवार या दिवसावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाचा प्रभाव असतो, असे मानले जाते. तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरु, दत्तावतार आणि दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते. नववर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला, तर त्याची प्रचिती येऊ शकते, असे म्हटले जाते.
प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्य सेवा करणारे लाखो भाविक आहेत. परंतु, स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु, काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे, अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊन नये. स्वामींना मनापासून साद घाला, क्षमायाचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा. धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते, असे सांगितले जाते. एक म्हणजे ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा आवर्जून किमान १०८ वेळा तर किमान यथाशक्ती जप करावा. दुसरे म्हणजे सर्वांत प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे. दररोज शक्य नसेल, तर दर गुरुवारी वेळात वेळ काढून तारक मंत्र अवश्य म्हणावा.
अशक्यही शक्य करतील स्वामी
'तारक मंत्र' या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करतात, अशी मान्यता आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही, असे म्हटले जाते. शेवटही स्वामींची शक्ती अगम्य आहे. हा मंत्र म्हणायला सुरवात केल्यावर मानसिक बळ येते, याची अनुभूती अनेकांनी घेतलेली असल्याचे सांगितले जाते. हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. "अतर्क्य अवधूत हे स्मर्तूगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी", फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात. फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत, असे सांगितले जाते. अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत. आपणही संकल्पाने सुरुवात करा आणि स्वानुभव घ्या.
स्वामींचा एक प्रभावी तारक मंत्र
नि:शंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तूगामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भीती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||