Yoga Tips: झोप पूर्ण होत नाही? दिवसभर आळस जाणवतो? झोपण्यापूर्वी करा 'हा' छोटासा प्रयोग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 07:05 IST2025-04-19T07:00:00+5:302025-04-19T07:05:01+5:30
Yoga Tips: ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सांगतात, ब्रह्ममुहूर्तावर उठा! पण ज्यांची झोपच पूर्ण होत नाही, त्यांनाही त्या मार्गदर्शन करताना म्हणतात...

Yoga Tips: झोप पूर्ण होत नाही? दिवसभर आळस जाणवतो? झोपण्यापूर्वी करा 'हा' छोटासा प्रयोग!
ब्रह्मकुमारी शिवानी दीदी आपल्या प्रवचनातून नेहमी ब्रह्म मुहूर्तावर उठा असे सांगतात. पण लोकांची स्थिती अशी आहे, की अलार्म बंद करून परत पाच मिनिटं झोपावेसे वाटते. रात्रभर झोपूनही झोप पूर्ण होत नाही. दिवसभर थकवा जाणवतो आणि जांभई येते. जे वेळेवर उठू शकत नाहीत ते ब्रह्म मुहूर्तावर कुठून उठणार? याबाबत शिवानी दिली सांगतात,
'आपण झोपतो म्हणजे आपले शरीर झोपते. पण मन अविरत जागे असते. त्याला आपण जागे ठेवतो. झोपेपर्यंत हातात मोबाईल असतो. काही ना काही व्हिडीओ पाहिले जातात, फोटो पाहिले जातात, गाणी ऐकली जातात. त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि तो तेच विषय मनात अर्थात विचारात घोळवत राहतो. त्यामुळे विचार चक्र सुरु राहते आणि वेळेवर झोप येत नाही.
'दिवसभर डोक्यात इतके विचार असतात, की पाठ टेकवल्यावर शरीर थांबते पण विचार थांबत नाहीत. त्या विचारांवर विचार सुरू राहतात आणि झोपेचं खोबरं होतं. नावाला रात्रभर झोपतो पण मेंदूची झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर ग्लानी येत राहते आणि आळस चढतो.'
'योगशास्त्रात झोपेला योगनिद्रा म्हटले आहे. योगनिद्रा ही तना-मनावरचा थकवा घालवते. याउलट आपण पाच-सहा तास झोपूनही आणखी झोप घेण्यासाठी आसुसले असू तर तना-मनाचे चार्जिंग पूर्ण झालेले नाही असे समजावे. टीव्ही, मोबाईल, अन्य गॅझेटच्या अति वापराचा हा दुष्परिणाम आहे. त्यामुळेच दिवसभर कुठेही बसलात तरी पटकन झोप लागते.
'झोपेकडे ध्यान म्हणून बघायचे असेल तर त्याची पूर्व तयारीदेखील तशीच असायला हवी. सूर्यास्तानंतर आपण ज्याप्रमाणे अन्न आणि पाण्याचे सेवन कमी कमी करत जातो, त्याप्रमाणे गॅझेट बाबतीतही करायला हवे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून रात्री नऊ नंतर शरीर आणि मनाला वैचारिक खाद्य पुरवू नये. रात्री १० वाजता झोपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसून प्राणायाम करावे. श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हावे आणि झोपी जावे.
लवकर झोपल्याने जागही लवकर येते आणि अलार्म वाजण्याआधीच झोप पूर्ण होते. ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यानधारणा केल्याने करिअर आणि आरोग्याबाबतीत अनेक लाभ होतात. तसेच झोपेची तक्रार दूर होते आणि दिवसभर थकवा न जाणवत ताजेतवाने वाटते.