३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:35 IST2025-12-25T16:34:02+5:302025-12-25T16:35:28+5:30
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.

३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते धर्म ध्वज स्थापन करण्यात आला. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर आता मंदिर परिसर अधिक भव्य आणि आकर्षक झाला आहे. दररोज लाखो भाविक अयोध्येत रामललाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. रामललाच्या दर्शनाने धन्य आणि मनाने तृप्त होतात. याच राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
अयोध्येच्या राम मंदिरात पुन्हा एकदा पाच दिवसांचे सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होत आहेत. २८ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ पर्यंत राम मंदिराचा दुसरा वर्धापन साजरा केला जाणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पौष शुक्ल द्वादशी तिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा करून राम मंदिराचे लोकार्पण केले होते. यंदा हा दिवस ३१ डिसेंबर २०२५ रोजी येत आहे. गेल्या वर्षी हा दिवस ११ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला होता. ३१ डिसेंबर २०२५ रोजी राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का?
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा द्वादशीनिमित्त राम मंदिर परिसरात पाच दिवसांचा सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होणार आहे. राम मंदिराच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी म्हणजेच अंगद टीला येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सामान्य रामभक्त यात सहभागी होऊ शकणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी राम मंदिर आणि श्रीरामांचा दरबार नेहमीप्रमाणे रामभक्तांच्या दर्शनासाठी खुला राहील. ३१ तारखेला रामभक्तांना रामललाची विशेष पूजा आणि आरास पाहायला मिळू शकेल. राम मंदिर ट्रस्टने यासाठी व्यापक तयारी केली आहे.
दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी प्रतिष्ठा द्वादशीचा दिवस ११ जानेवारी रोजी होता. यावर्षी हा दिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. सकाळी ९.३० वाजता विशेष पूजन होणार आहे. नेहमीप्रमाणे रामभक्तांना त्या दिवशीही दर्शन घेता येईल. भाविक अयोध्येत येऊ शकत नसतील, तर ते त्यांच्या घरातून राम मंदिरातील रामललाची पूजा पाहू शकतात. ट्रस्टने दूरदर्शनला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची विनंती केली आहे.