शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व काय? ती कशी साजरी करतात व तिचे फलित काय? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 11:34 IST2022-01-17T11:33:52+5:302022-01-17T11:34:58+5:30
नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरीता आहे, त्यात अडकून राहावे यासाठी नाही. हे लक्षात घेऊन आपण सण उत्सव साजरे केले पाहिजेत!

शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व काय? ती कशी साजरी करतात व तिचे फलित काय? जाणून घ्या!
पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंभरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते. म्हणून या पौर्णिमेला 'शाकंभरी पौर्णिमा' म्हटले जाते. या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा, साठ प्रकारच्या कोशिंबिरींचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक दाखवला जाते. हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरांमध्ये पाळला जातो.
पूर्वी घराघरांमध्ये आक्का, मावशी, आत्या, आजी, काकू, ताई, आई, माई असा भरपूर मोठा गोतावळा असे. घरात पुरुषवर्गाइतका महिलावर्गाचा राबता असे. शिवाय हाताशी गडी माणसेदेखील कामाला असत. तसेच आतासारखे नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असे. परंतु जसजशी कुटुंबे विभक्त होऊ लागली, तसतशी कुळधर्म, कुळाचार सोपस्कार बनून राहिला. करणारी बाई एक आणि खाणारी तोंडं दहा असली, तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार? म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले. त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले.
नवरात्र म्हटली की पुरणावरणाचा स्वयंपाक आला. परंतु आजकाल नोकरी, शिक्षण, व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी उसंत मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवडही उरलेली नाही. त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोळवण करतात. त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे, तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो. त्यामुळे कालानुरुप झालेले बदल आक्षेपार्ह नाहीत, फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये, एवढी माफक अपेक्षा आहे.
नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरीता आहे, त्यात अडकून राहावे यासाठी नाही. हे लक्षात घेता सण-उत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तीभावाने आपण देवीला दाखवलेला नैवेद्य ती निश्चितच स्वीकारेल आणि आपल्याला तसेच सर्वांना कसलीही कमतरता पडू देणार नाही. शेवटी देवी ही आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक भूल पदरात घेते. फक्त आपण तिच्याप्रती आदरभाव ठेवायला हवा. असे पूर्ण विचारांचे चांदणे मनात प्रतिबिंबित झाले, तरच ही शाकंभरी पौर्णिमा साजरी झाली, असे म्हणता येईल.