२०२५च्या शुभारंभालाच अशुभ योग: ३ जानेवारीला पंचक लागणार; ‘ही’ कामे चुकूनही करु नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:56 IST2025-01-02T09:48:57+5:302025-01-02T09:56:54+5:30

2025 First Panchak In January: कधी लागणार पंचक? असा असेल प्रभाव? नेमकी कोणती कामे टाळावीत? जानेवारीत लागणाऱ्या पंचकाचे नाव काय? जाणून घ्याा...

what do you mean by panchak in marathi and chor panchak between 3 january 2025 to 07 january 2025 know about these 5 days are not auspicious should avoid this things | २०२५च्या शुभारंभालाच अशुभ योग: ३ जानेवारीला पंचक लागणार; ‘ही’ कामे चुकूनही करु नका!

२०२५च्या शुभारंभालाच अशुभ योग: ३ जानेवारीला पंचक लागणार; ‘ही’ कामे चुकूनही करु नका!

2025 First Panchak In January: २०२५ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. यावर्षी नवग्रहांपैकी चार महत्त्वाचे आणि अधिक प्रभावकारी ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. याचा केवळ राशी, मूलांक यावर नाही, तर देश-दुनियेवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जाते आहे. जानेवारीपासून विविध योग जुळून येत आहेत. परंतु, या सगळ्यात सन २०२५चे पहिले पंचक जानेवारी महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच लागणार आहे. पंचक म्हणजे काय? जानेवारी २०२५ला कधी लागणार पंचक? नेमकी कोणती कामे किंवा गोष्टी या काळात करू नये? जाणून घेऊया...

ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.

पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर...

पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. 

जानेवारी २०२५ मध्ये कधी आणि कोणते पंचक लागणार?

पंचकाचे नाव वारानुसार असते. प्रत्येक पंचकाचे स्वतःचे महत्त्व असते. कोणत्या दिवशी पंचक लागणार, त्यानुसार पंचक नाव असते. म्हणजेच रविवारपासून सुरू होणारे पंचक रोग पंचक, सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचक राज पंचक, मंगळवारी अग्नि पंचक, शनिवारी मृत्यु पंचक आणि शुक्रवारी चोर पंचक लागते. सन २०२५चे पहिले पंचक शुक्रवार, ०३ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. हे पंचक चोर पंचक म्हणून ओळखले जाईल. ०३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजून ४७ मिनिटांनी पंचक सुरू होणार आहे. तर मंगळवार, ०७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०५ वाजून ५० मिनिटांनी पंचक संपेल.

पंचक काळात कोणत्या गोष्टी करू नयेत? नेमके काय टाळावे?

- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.

- पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.

- ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. 

- ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

- चोर पंचक काळात शक्यतो खूप मोठे व्यवहार टाळावेत, असा सल्ला दिला जातो. अन्यथा धनहानी, नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. 

- चोर पंचक काळात महत्त्वाच्या गोष्टी, वस्तू, पैसे चोरीला जाण्याची शक्यता बळावते, असे दावा केला जातो. त्यामुळे या काळात प्रवासात, व्यवहारात सतर्क राहावे. अखंड सावध राहावे, असे म्हटले जाते. 

- चोर पंचक काळात नवीन व्यवसाय, व्यापार किंवा व्यवहारांशी संबंधित कामांचा शुभारंभ करू नये, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: what do you mean by panchak in marathi and chor panchak between 3 january 2025 to 07 january 2025 know about these 5 days are not auspicious should avoid this things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.