विठू माउलीचा 'लाडका भक्त': पुंडलिक पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल भक्तीचा जागर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:05 IST2026-01-28T07:00:01+5:302026-01-28T07:05:01+5:30

आई-वडिलांच्या सेवेतून देव कसा प्राप्त होतो? भक्त पुंडलिक पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख

Vithu Mauli's 'favorite devotee': Vigil of Vitthal devotion on the occasion of Pundalik's death anniversary! | विठू माउलीचा 'लाडका भक्त': पुंडलिक पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल भक्तीचा जागर!

विठू माउलीचा 'लाडका भक्त': पुंडलिक पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल भक्तीचा जागर!

"पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा..."

पंढरीचा विठ्ठल आज जो विटेवर उभा आहे, त्यामागे केवळ आणि केवळ भक्त पुंडलिकाची निष्ठा आणि मातृ-पितृ भक्ती कारणीभूत आहे. माघ शुद्ध दशमी हा दिवस 'भक्त पुंडलिक पुण्यतिथी' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे निस्वार्थ सेवेचा आणि भक्तीच्या पराकाष्ठेचा विजय सोहळा आहे.

भक्त पुंडलिकाची कथा आणि भक्तीचा आदर्श

सुरुवातीला आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणारा पुंडलिक जेव्हा कुक्कुटमुनींच्या आश्रमात गेला, तेव्हा त्याला मातृ-पितृ सेवेचे खरे महत्त्व पटले. त्यानंतर त्याने आपले संपूर्ण जीवन आई-वडिलांच्या चरणी अर्पण केले.

त्याची ही निस्सीम सेवा पाहून प्रत्यक्ष भगवान विष्णू वैकुंठातून त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. मात्र, पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की, देवाला समोर पाहूनही तो म्हणाला, "देवा, थोडा वेळ थांबा, माझी सेवा अर्धवट राहील." देवाला उभे राहण्यासाठी त्याने जवळच असलेली एक 'वीट' सरकवली. पुंडलिकाची ही सेवा आणि निष्ठा पाहून देव इतके प्रसन्न झाले की, ते आजही त्या विटेवर दोन्ही हात कटीवर ठेवून उभे आहेत.

वारकरी संप्रदायाचा पाया

संतांनी म्हटले आहे, "पुंडलिके दिले वरदान, विठ्ठल राहे उभा समान!" वारकरी संप्रदायात विठ्ठलाच्या आधी पुंडलिकाचे नाव घेतले जाते - "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!" हे या भक्ताच्या श्रेष्ठत्वाचे प्रतीक आहे. पुंडलिकाने जगाला हे शिकवले की, देवाला शोधण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही; जर तुम्ही तुमच्या कर्तव्याचे (विशेषतः आई-वडिलांच्या सेवेचे) पालन केले, तर देव स्वतः तुमच्याकडे चालत येतो.

पुण्यतिथीनिमित्त काय करावे?

१. आई-वडिलांची सेवा: हा दिवस त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. 
२. नामस्मरण: 'विठ्ठल विठ्ठल' नामाचा जप करावा. ३. पुंडलिक वरदा स्तोत्र: भक्त पुंडलिकाच्या महतीचे वाचन करावे. 
४. दर्शन: शक्य असल्यास पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घ्यावे.

Web Title : भक्त पुंडलिक पुण्यतिथि: विट्ठल भक्ति और पितृ भक्ति का उत्सव

Web Summary : पुंडलिक की भक्ति से विट्ठल पंढरपुर में ईंट पर खड़े हुए। माता-पिता की निस्वार्थ सेवा वारकरी परंपरा की नींव है। यह दिन माता-पिता का सम्मान करने, विट्ठल का नाम जपने और पुंडलिक स्तोत्र पढ़ने के द्वारा मनाया जाता है।

Web Title : Devotee Pundalik's Death Anniversary: Celebrating Vithal Bhakti and Parental Devotion

Web Summary : Pundalik's devotion moved Lord Vithal to stand on a brick in Pandharpur. His selfless service to his parents is the foundation of Varkari tradition. The day is celebrated by honoring parents, chanting Vithal's name, and reading Pundalik Stotra.