Vinayak Chaturthi: सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पाकडे नेमके काय मागायला हवे सांगताहेत सद्गुरू वामनराव पै!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:50 IST2023-03-24T10:50:00+5:302023-03-24T10:50:01+5:30
Vinayak Chaturthi: आपल्या मागण्या बऱ्याच असतात, मात्र प्रत्यक्षात देवाशी गाठ भेट पडली तर प्रापंचिक मागणे मागण्याऐवजी पारमार्थिक मागणे कसे मागावे वाचा.

Vinayak Chaturthi: सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पाकडे नेमके काय मागायला हवे सांगताहेत सद्गुरू वामनराव पै!
देव आपल्याला भेटावा आणि त्याने आपले सगळेच प्रश्न सोडवावेत, असे आपल्या प्रत्येकाला वाटते. परंतु, उद्या यदाकदाचित, देव समोर आलाच, तर त्याच्याकडे आपल्या 'बकेट लिस्ट' मधून नेमके काय माागावे, ते सांगत आहेत, सद्गुरू वामनराव पै. २५ मार्च रोजी नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी. सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पाकडे काय मागावे ते जाणून घेऊ.
दोन भक्त होते. आपल्या इच्छापूर्तीसाठी दोघेही एकाच ठिकाणी ध्यान मग्न होऊन बसले. त्यांनी बरीच वर्षे तपश्चर्या केली. शेवटी देव त्यांच्यापैकी एकाला प्रसन्न झाल़े दुसऱ्याचे डोळे अजूनही बंदच, हे पाहून पहिला सुखावला. देवाने त्याला दर्शन न देता आपल्याला दर्शन दिले, त्यामुळे पहिल्याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटू लागला. देवाने त्याला वर मागायला सांगितला. तो विचारात पडला. सोने, चांदी, बंगला, गाडी, बायको, मुलं, संसार अशी मोठी यादी मनातल्या मनात मोजू लागला. ते पाहून भगवंत म्हणाले, 'तू खूपच मोठी यादी केलेली दिसते. पण एक लक्षात ठेव, तू जेवढे मागशील, त्याच्या दुप्पट तुझ्या तुझ्या या मित्राला मिळेल.'
हे वाक्य कानावर पडताच. पहिल्याने आपली बकेट लिस्ट मनातल्या मनात फाडून टाकली. आपल्यापेक्षा त्याला जास्त मिळणार, या विचाराने, त्याच्या मनात वाईटात वाईट विचार घोळू लागले. शेवटी बराच विचार करून तो देवाला म्हणाला,
'देवा, माझा एक डोळा फोड.'
देव तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्याचा एक आणि मित्राचे दोन डोळे फुटले. पहिला आनंदून गेला. दुसऱ्याची काही चूक नसताना अतोनात नुकसान झाले. मात्र, अशाप्रकारे केलेल्या मत्सरात आपण आपला अमुल्य डोळा गमावला, याचे पहिल्याला अजिबात वैशम्य वाटले नाही. यावरून कळते, आपले भले झाले नाही, तरी चालेल, पण दुसऱ्याचे भले होता कामा नये, अशी वृत्ती म्हणजे विकृती!
आपले भले झाले, आता दुसऱ्यांचे काहीही होवो, आपल्याला काय, अशी वृत्ती म्हणजे प्रवृत्ती!
आणि माझ्यासकट सर्व विश्वाचे भले होवो, अशी वृत्ती म्हणजे संस्कृती!
म्हणून आपल्या सर्व संतांनी, कधीही स्वत:साठी न मागता साऱ्या विश्वासाठी प्रार्थना केली. ज्ञानेश्वर माऊलींनी तर 'जो जे वांछिल तो ते लाहो' म्हणत, विश्वकल्याणासाठी पसायदान मागितले. असेच दान आपणही मागितले पाहिजे.
काही लोक एवढे हुशार असतात. त्यांना कधी, कुठे, काय मागावे हे बरोबर कळते. एका ९० वर्षाच्या गरीब म्हाताऱ्याने देवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला, `देवा, मला माझ्या पणतूला राजसिंहासनावर बसलेला माझ्या डोळ्यांनी पहायचा आहे.' म्हणजे एका मागणीत ऐश्वर्य, आरोग्य आणि आयुष्य मागून घेतले. पण स्वतःपुरते मागणे मागून आपण कधीच सुखी होऊ शकत नाही.
भगवंत आपल्या प्रत्येक मागणीला नेहमी तथास्तू म्हणत असतो. म्हणून देवाकडे मागणे मागावे,
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
दुसऱ्याच्या सुखासाठी स्वत:ची ओंजळ पुढे करा, देव त्यांच्यासकट तुमचेही भले करेल. त्याच्याकडे नुसती बुद्धी नाही, तर चांगली बुद्धी मागायची आहे. सगळ्यांनी चांगला विचार केला, तर वाईट गोष्टी घडणारच नाहीत आणि सगळे जण आपोआप सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहतील. निश्चिंत मनाने जगतील आणि हाताने काम करता करता, मुखाने हरीनामही आनंदाने घेतील.