Vastu Tips: देवघरात देवांची गर्दी करू नका, मोजकेच पण 'हे' महत्त्वाचे देव अवश्य ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:08 IST2022-11-17T13:08:12+5:302022-11-17T13:08:40+5:30
Vastu Shastra: ज्याप्रमाणे आपण घरात मोजकं सामान ठेवतो, तसं देवाचं घरही स्वच्छ आणि टापटीप ठेवावं तरच ते पाहणार्यालाही प्रसन्न वाटतं!

Vastu Tips: देवघरात देवांची गर्दी करू नका, मोजकेच पण 'हे' महत्त्वाचे देव अवश्य ठेवा!
हिंदू दैवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले, तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी, असे शास्त्र सांगते. पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात व नंतर पूजेत ठेवतात. यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली, तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते, की त्या सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते. हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये.
देवाच्या विलोभनीय मूर्ती, तसबिरी विकत घ्याव्याशा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु त्या सगळ्याच मूर्ती देव्हाऱ्यात ठेवून गर्दी करू नये. अशा तसबिरी, मूर्ती शोभेच्या किंवा सजावटीच्या मूर्ती म्हणून ठेवाव्यात. त्या जिथे ठेवणार असू तिथेही शुचिर्भूतता महत्त्वाची असते. उदा. त्या मूर्तीजवळ किंवा आसपास चपलांचे जोड ठेवू नये, त्याच टेबलावर सिगारेटचा ट्रे ठेवू नये, जेवणाचे ताट आणि ती मूर्ती, तसबीर एका जागी असू नये. थोडक्यात ती देव्हाऱ्यात ठेवली नाही तरी तिचे पावित्र्य जपावे. मग प्रश्न येतो, देव्हाऱ्यात कोणते देव असावे याचा!
देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही. म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे. देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. ते देव कोणते ते जाणून घेऊया.
प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते. सून आल्यावर तिच्या माहेरचीही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते. त्यांचे स्थान अढळ आहे. याशिवाय कुलदेवतांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तसबीर वा मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी. याउपर मूर्तींची किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये.
अनेक घरांमध्ये यंत्र, शाळीग्राम, दोन शिवलिंग, दोन शंख अशाही गोष्टी आढळतात. तसे करणे योग्य नाही. देव्हारा सुटसुटीत असावा. तिथे फुलांची आरास असावी, तसबिरींची किंवा मूर्तीची नाही. देव्हारा हे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, मग अशा क्षणभरात प्रचंड ऊर्जा, सकारात्मकता देण्याची शक्ती त्या देव्हाऱ्यात असताना तिथे गर्दी करून कसे चालेल? म्हणून आपले आराध्य दैवत आणि मुख्य देवता या व्यक्तिरिक्त मूर्ती ठेवणे टाळावे. त्या पूजेसाठी न ठेवता अन्यतर पण स्वच्छ जागी ठेवाव्यात, असे शास्त्र सांगते!