Vastu Shastra: गळके, निकामी नळ वेळीच दुरुस्त करा किंवा बाद करा; अन्यथा पाण्यासारखा वाहून जाईल घरातला पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:09 IST2023-03-15T17:08:06+5:302023-03-15T17:09:03+5:30
Vastu Tips: पाण्याची खरी किंमत उन्हाळ्यात जास्त कळते, अशातच घरचे पाणी थेंबे थेंबे वाया जात असेल तर हे नुकसान परडवणारे नाही; वास्तुशास्त्र सांगते...

Vastu Shastra: गळके, निकामी नळ वेळीच दुरुस्त करा किंवा बाद करा; अन्यथा पाण्यासारखा वाहून जाईल घरातला पैसा!
आपण सर्वांनी कितीही सुंदर घर बांधले तरी त्यात पाण्याची योग्य व्यवस्था नसेल तर सर्व काही निरुपयोगी ठरते. वास्तुशास्त्रामध्ये पाण्याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याची माहिती आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तुमच्या घरातील नळ वाहत असतील तर त्याचे वास्तुशास्त्रानुसार होणारे दुष्परिणाम जाणून घ्या!
पाण्याचा निचरा योग्य दिशेने करा
सर्वप्रथम, हे लक्षात ठेवा की घराच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नेहमी उत्तर दिशेला करावी. घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते. जर चुकीच्या दिशेला पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केलीत तर ते तुमची संपत्ती पाण्यासारखी प्रवाही होत घराबाहेर जाऊ शकते. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करताना त्याच्या योग्य दिशेची विशेष काळजी घ्यावी.
आंघोळीची उपकरणे योग्य दिशेने ठेवा
घरात बसवलेले पाण्याचे नळ, शॉवर बाथ टब हेदेखील नेहमी उत्तर किंवा ईशान्य कोनात असायला हवे. त्याचप्रमाणे वॉश बेसिन देखील उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात असावे. गीझर घराच्या आग्नेय कोनावर ठेवावा.
नळातून पाणी गळत असल्यास सावध रहा
पाणी अतिशय बहुमूल्य आहे. त्याची उधळपट्टी करणे चांगले नाही. त्याचा जपून वापर करायला हवा. यासाठी नळाची डागडुजी वेळच्या वेळी करायला हवी. गळके नळ बदलून घ्यायला हवेत. नादुरुस्त नळ बदलून नवे नळ बसवायला हवेत. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत तर पाण्याचा अपव्यय तर होईलच, शिवाय तुमच्या घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतील. पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च होईल. धनसंचय अर्थात सेव्हिंग न होता वरचेवर पैसा खर्च होईल. त्यामुळे पैशांची आणि पाण्याची बचत यांचे महत्त्व वेळीच ओळखा आणि सावध पाऊले उचला!