Vastu Shastra: घरामध्ये तांब्याचे सूर्यचिन्ह ठेवल्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:39 IST2023-02-07T16:39:26+5:302023-02-07T16:39:53+5:30
Vastu Tips: सूर्यामध्ये जेवढी सकारात्मकता आहे, तेवढीच त्याचे प्रतीक असणाऱ्या तांब्याच्या सूर्यचिन्हात आहे, कशी ते बघा.

Vastu Shastra: घरामध्ये तांब्याचे सूर्यचिन्ह ठेवल्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!
वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी वास्तूच्या विकासासाठी वापरल्या जातात. त्या गोष्टी प्रतीकात्मक स्वरूपात असतात. त्या प्रतीकांचा लाभ वास्तुदोषाचे निराकरण करण्यासाठी केला जातो. पैकी एक म्हणजे ताब्यात घडवलेले सूर्याचे प्रतीक. त्यामुळे कोणती ऊर्जा मिळते आणि कोणते दोष दूर होतात ते जाणून घेऊ.
घरात सूर्यप्रकाश येणे सर्वार्थाने चांगले, मात्र अनेकांच्या घरात जागेअभावी प्रकाश येतो, मात्र थेट सूर्यकिरणे येत नाहीत. अशा घरांमध्ये सूर्याची ऊर्जा, सकारात्मकता यांचा प्रभाव घरावर पडावा यासाठी तांब्यापासून बनवलेल्या सूर्याच्या प्रतीकाचा वापर केला जातो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तांब्याचा सूर्य मुख्यत्वे वापरला जातो. मात्र तो योग्य जागी आणि योग्य दिशेला लावणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूच्या नियमांनुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्याने घर असो किंवा ऑफिस, सर्व ठिकाणी मान-सन्मान मिळतो.
>>तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते. ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींनाही आकर्षित करते. त्यामुळे पैसा, संपत्ती, नवनवीन संधी मिळवण्याच्या दृष्टीनेही हे प्रतीक घरात लावले जाते.
>>ज्या घरात लोकांचे आपापसात मतभेद असतात, अशा लोकांनी घरात सूर्याचे प्रतीक आवर्जून लावावे. कलहाचे वातावरण तयार करणारी ऊर्जा या प्रतीकाद्वारे शोषून घेतली जाते आणि घरच्यांचे परस्परसंबंध सौहार्दपूर्ण होतात असा अनेकांचा अनुभव आहे.
>>जे लोक व्यापार तसेच कला क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी आपल्या घरात तांब्याचा सूर्य लावावा. तुमच्या सृजनत्त्वाला बळ देण्याचे सामर्थ्य त्या छोट्याशा प्रतिकात आहे. पण ते नेमके लावायचे कुठे? कोणत्या दिशेला? तर -
>>जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावावा. यामुळे मोठे दोष दूर होतात. घरात समृद्धी येते. ते प्रतीक वारंवार दृष्टीस पडल्याने आपले विचारही सूर्यासारखे प्रखरआणि तेजस्वी बनतात. म्हणून आपल्या शास्त्रानेही प्रभाते सूर्यदर्शन घ्या म्हटले आहे. ज्यांना ते शक्य नाही, त्यांनी निदान प्रतीक लावून सूर्य दर्शनाचा लाभ घ्यावा, असे वास्तुशास्त्र सांगते.
>>जर मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या घराकडे धन-संपत्तीचा ओघ वाढतो. हे प्रतीक तिथे लावल्याने घरात येता जाता सूर्य दर्शन होईल.
>>ऑफिसमध्ये पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.
असे मानले जाते की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल, तर तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ मिळू शकतो. तुम्ही ते ऑफिसमध्ये किंवा घरी कुठेही लावू शकता. तांब्याच्या सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवते.