Valmiki Jayanti 2025: महर्षि वाल्मिकी यांचे चरित्र म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा आदर्श; जयंतीनिमित्त अभिवादन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:29 IST2025-10-07T16:28:15+5:302025-10-07T16:29:47+5:30
Valmiki Jayanti 2025: वाल्याचा वाल्मिकी झाला असे आपण म्हणतो, पण तो होण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर आयुष्याला मिळालेली ऊंची यांचे उत्तम उदाहरण म्हणजे महर्षि वाल्मिकी!

Valmiki Jayanti 2025: महर्षि वाल्मिकी यांचे चरित्र म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा आदर्श; जयंतीनिमित्त अभिवादन!
रामायणाचे रचेते तसेच संस्कृत, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे सखोल अभ्यासक महर्षी वाल्मिकी यांचा जन्म दिवस अश्विन शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो, म्हणून आज आपण त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे चिंतन करणार आहोत.
पौराणिक कथेनुसार महर्षी वाल्मिकी यांचा जन्म महर्षी कश्यप आणि अदिती यांचा नववा सुपुत्र वरुण आणि त्याची पत्नी चर्षणी यांच्या घरी झाला होता. त्यांच्या भावाचे नाव भृगु होते. मात्र, बालपणीच या तेजस्वी बाळाला एका गरीब स्त्रीने चोरून नेले आणि आपल्याकडेच ठेवून घेत त्याचे पालन पोषण केले. वाल्मिकीचा वाल्या झाला. असंगाशी संग जुळला आणि वाल्या दरोडेखोर झाला.
आपल्या परिवाराचे पालन-पोषण करण्यासाठी तो जंगल परिसरातून येणा-जाणाऱ्या वाटसरूला अडवून त्याला लुटत असे. त्या ऐवजावर त्याची आणि घरच्यांची गुजराण चालत असे. एकदा त्याच जंगलातून महर्षी नारद जात होते. वाल्याने त्यांना अडवले आणि त्यांच्याकडून धन,संपत्तीची मागणी केली. नारद म्हणाले, माझ्या मुखातील नारायण या नावाशिवाय माझ्याजवळ तुला देण्यासारखे काहीच नाही. ते नाव हवे, तर जरूर घे. वाल्याने त्यांना दरडावले. तेव्हा नारदांनी त्याला विचारले, `ज्यांच्यासाठी तू हे पाप करतोयस, ते तरी तुझ्या पापात सहभागी आहेत का? एकदा जाऊन त्यांना विचारून तरी ये. तोवर वाटल्यास मला इथेच बांधून ठेव.'
वाल्या प्रश्नात पडला. त्याने नारदांना जाड दोरीने झाडाला बांधून ठेवले आणि आपण घरी निघून गेला. घरी जाऊन त्यांनी बायको आणि मुलांना आपण करत असलेल्या पापाचे वाटेकरी आहात ना, असे विचारले. तर हे तर तुमचे कर्तव्यच आहे, असे म्हणत सगळ्यांनी जबाबदारी झटकली. खिन्न मनाने वाल्या जंगलात परत आला. त्याने नारदांना सोडले, क्षमा मागितली आणि पापाचे प्रायश्चित्त विचारले. महर्षी नारद म्हणाले, `तू भगवंताचे नाम घे आणि त्याचे कार्य सुरू कर.' वाल्याला `राम' नावाचा मंत्र दिला, परंतु मरा आणि मारा एवढेच ठाऊक असलेल्या वाल्याच्या तोंडून राम नाम निघेना. त्यावर नारदांनी त्याला मरा, मरा म्हणायला सांगितले. ते म्हणता म्हणता आपोआप राम राम नाम येऊ लागले. त्या नामात वाल्या एवढा रंगून गेला, की त्याच्या भोवती मुंग्यांचे वारूळ तयार झाले, तरी त्याला कळले नाही. अखेरीस प्रभुकृपा झाली, त्याची तपश्चर्या फळाला आली. त्या रामनामावरून त्याला रामायण हे महाकाव्य सुचले आणि ते काव्य अजरामर झाले. त्याबरोबरच वाल्यादेखील वाल्मिकी महर्षी म्हणून नावरूपास आला.
मात्र काही ठिकाणी याबाबत मतभेद आहेत. रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषि वेगळे होते असेही म्हणतात. मात्र या महाकाव्याने त्यांचे जीवन पालटले असा त्यांच्या कथेचा आशय आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्ति वेगवेगळ्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले परिवर्तन अनुकरणीय आहे.
कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये, हे महाभारतातून शिकावे असे म्हणतात. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने हे दोन्ही धर्मग्रंथ महत्त्वाचे आहेत. पैकी रामायणाचे रचेते महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करूया आणि रामायणात त्यांनी रेखाटलेला, राम आपल्याही आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करूया.
श्रीराम जय राम जय जय राम!