विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:28 IST2025-04-30T18:24:34+5:302025-04-30T18:28:33+5:30
Vaishakh Vinayak Chaturthi May 2025 Vrat Puja: विनायक चतुर्थी कधी आहे? व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या...

विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
Vaishakh Vinayak Chaturthi May 2025 Vrat Puja: मराठी वर्षातील दुसरा वैशाख महिना सुरू झाला आहे. या वैशाख महिन्यात विविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. मे महिन्याची सुरुवातही होत आहे. प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाच्या शुभाशिर्वादाने महिन्याला प्रारंभ होत आहे. कारणही तसेच आहे. ०१ मे २०२५ रोजी वैशाख विनायक चतुर्थी आहे. या विनायक चतुर्थीचे व्रत कसे करावे? सोपी पद्धत, महत्त्व, महात्म्य आणि मान्यता जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे.
वैशाख विनायक चतुर्थीचे व्रत पूजन करण्याची सोपी पद्धत
विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून नित्यकर्मे करावीत. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. षोडशोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल, तर पंचोपचाराने गणपती पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत. संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे.
गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच
धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. मनोभावे गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. तसेच गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||