unknown story sai baba never forgets his devotees | साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

ठळक मुद्देशिर्डीच्या साईबाबांची अज्ञात पण प्रेरणादायी कथासाईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाहीत, असा अनेकांचा अनुभवव्यापाऱ्याचा आजारी मुलगा आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

शिर्डीचेसाईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहेत. जगभरात साईबाबांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. साईबाबांच्या दरबारात सर्वांना येण्याची परवानगी दिली जाते. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची असो. साईबाबांनी आपल्या अनेक कृतीतून समाजाला उत्तमोत्तम उपदेश, शिकवण, बोध दिले आहेत. साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा...

एका व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी होता. किती काही केल्या त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. अनेक वैद्य करून झाले. मात्र, तरीही गुण येत नव्हता. व्यापारी साईबाबांचा मोठा भक्त होता. त्या मुलाला त्याने साईबाबांकडे नेण्याचे निश्चित केले. मुलाला घेऊन त्याने लगेचच शिर्डी गाठली. साईबाबांचरणी नतमस्तक होऊन मुलाच्या आजाराबाबत माहिती दिली. 

साईबाबांनी स्मितहास्य केले आणि मुलाला आशिर्वाद दिला. दिवस मावळला, तसे मुलाला बरे वाटू लागले. साईबाबांमुळे मुलगा बरा झाल्याचे त्याने गावभर सांगितले. मात्र, त्याला थांबवत साईबाबा म्हणाले की, सबका मालिक एक. केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवन देऊ शकतो. यात माझे काही सामर्थ्य नाही. 

काही दिवस व्यापारी शिर्डीत राहिला. मुलाच्या आरोग्यात फरक पडलेला पाहून तो मुंबईला परतला. मुंबईत परतण्यापूर्वी त्या दोघांनी साईबाबांची भेट घेतली. तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले की, दोन रुपये मी तुला आधीच दिले आहेत. आता हे तीन रुपये घे आणि ते पूजास्थानी ठेव. देवाचे नामस्मरण कर. नेहमी चांगले कर्म कर. तुझे भले होईल, असा आशिर्वाद साईबाबांनी दिला. 

साईबाबांनी मला यापूर्वी कधी दोन रुपये दिले, हे त्या व्यापाऱ्याला काही केल्या आठवेना. या विचारातच त्याने मुंबई गाठली. घरी येऊन घडलेला सर्व प्रकार त्याने आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने एक जुनी आठवण त्याला सांगितली. आई म्हणाली की, बाळा, तू लहान असताना बराच आजारी होतास. तेव्हा तुझे वडील तुला साईबाबांकडे घेऊन गेले होते. त्यावेळेस साईबाबांनी तुला आशिर्वाद म्हणून दोन रुपये दिले होते. साईबाबा आपल्या भक्तांच्या मनाशी कायम जोडलेले असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, असे आई म्हणाली. आईने सांगितलेली हकीकत ऐकून त्या व्यापारी आनंद झाला. भक्त आणि देवाचे नाते खूप मजबूत असते. भक्त जरी देवाला विसरला, तरी देव मात्र, त्यांना कधीच विसरत नाहीत. देव नेहमीच कठीण परिस्थितीत भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, यावरील त्याचा विश्वास आणखी दृढ झाला.

Web Title: unknown story sai baba never forgets his devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.