Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:39 IST2025-11-03T13:18:14+5:302025-11-03T13:39:56+5:30
Tulsi Vivah 2025 Kanyadaan: कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यन्त, म्हणजेच यंदा 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान तुळशी विवाह करून आपल्याला कन्यादानाचे पुण्य मिळवता येईल.

Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
अनेक घरांमध्ये तुळशी विवाहाची परंपरा आहे. अर्थात हे केवळ एक व्रत नाही तर ती एक उपासना आहे. जिचा लाभ व्रतकर्त्याला अनेक स्वरुपात मिळतो. त्याबद्दल इतर लेखात आपण माहीती वाचलीच आहे, सदर लेखात तुळशी विवाहाने (Tulsi Vivah 2025) कन्यादानाचे पुण्य कसे मिळते ते जाणून घेऊ.
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी
भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे, हा विचारच किती सुखद आहे. तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. यंदा 2 ते 5 नोव्हेंबर हा कालावधी आहे. या दरम्यान तुम्हीदेखील पुण्यसंचयाची संधी दवडू नका.
श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्येे अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडे-या देण्यात येतात.
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
तुलसी विवाह केल्याने विवाह लावणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.
तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे.
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठति।
तद्गृहं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकरा।।
म्हणजे, ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग, रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जोतो, तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो. रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजलाइतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.
भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि 'तुलसी माता' या नात्याने तिचे पूजन करते. समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो, तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू . पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे. या गोष्टीचे आपल्याला भान यावे, म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो. उसासारखे रसमय जीवन असेल म्हणजे तारुण्यात प्रभुकार्य करता आले, तरच प्रभुच्या मिलनाची शक्यता राहू शकते.