आज अरण्यषष्ठी : आजच्या दिवशी मांजरीला दूध दिल्याने इप्सित मनोकामनांची पूर्ती होते म्हणतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 11:20 IST2023-05-25T11:20:15+5:302023-05-25T11:20:31+5:30
मूक प्राण्यांवरही प्रेम करायला शिकवणारी आपली संस्कृती, व्रत वैकल्य ही त्याची सुरुवात आणि मानवता हे त्याचे अंतिम ध्येय!

आज अरण्यषष्ठी : आजच्या दिवशी मांजरीला दूध दिल्याने इप्सित मनोकामनांची पूर्ती होते म्हणतात!
पारंपारिक हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ मासातील षष्ठी ही अरण्य षष्ठी म्हणून साजरी केली जाते. अरण्य षष्ठी आज २५ मे रोजी ही तिथी आहे. वनदेवता आणि भगवान कार्तिकेयाला ही तिथी समर्पित आहे. अरण्यषष्ठीचे व्रत करणाऱ्यांना संतती प्राप्ती होते असे म्हणतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आजच्या दिवशी वनदेवीची किंवा विंध्यवासिनी देवीची पूजा केली जाते. त्याच बरोबर उपासना म्हणून केवळ फलाहार केला जातो. वनदेवीचे स्तोत्र म्हटले जाते. ते पाठ नसेल तर देवीचे स्तोत्र अर्थात श्रीसूक्त म्हटले जाते. सकाळी आणि सायंकाळी देवीची पूजा केली जाते आणि हळद कुंकू लावून तिला दुधाचा, खडीसाखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवला जातो.
या व्रताबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते, की एकदा एका स्त्रीने एका मांजरीसाठी ठेवलेलं दूध चोरलं आणि स्वतःच पिऊन टाकलं. मांजरीच्या पिलांची उपासमार झाली. तिने त्या बाईला अद्दल घडवण्यासाठी तिचं बाळ चोरून अरण्यात नेऊन सोडलं. बाळाच्या ओढीने ती बाई वेडीपिशी झाली. अरण्यात जाऊन शोधू लागली. तिथल्या प्राचीन मंदिरात देवीसमोर उभी राहून चुकांची कबुली देऊ लागली आणि माझे बाळ मला परत मिळू दे अशी विनवणी करू लागली. तिला झालेला पश्चात्ताप आणि तिने मनोभावे केलेली प्रार्थना पाहून देवी प्रसन्न झाली आणि तिने तिला तिचे हरवलेले बाळ परत केले. तेव्हापासून ही तिथी देवीच्या उपासनेची आणि संतती प्राप्तीचा-व्रताची म्हणून साजरी केली जाते. यादिवशी मांजरीला दूध दिल्याने इप्सित मनोकार्य पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.
बंगालमध्ये हा दिवस जावई षष्ठी म्हणून साजरा केला जातो. ओरिसात या दिवशी शिव-पार्वती विवाह केला जातो. म्हणून ही तिथी शीतला षष्ठी म्हणून ओळखली जाते. असे हे आजच्या दिवसाचे महत्त्व पाहता आपणही शिव पार्वतीची उपासना करूया आणि मांजरीला दूध पाजून पुण्यसंचय करूया.