विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:30 IST2024-12-14T08:29:09+5:302024-12-14T08:30:05+5:30

Motivational Story: आपल्या मुलांनी त्यांच्या क्षेत्रात विश्वविक्रम करावा असे वाटत असेल तर त्यांना ध्येयनिश्चिती कशी करावी हे शिकवणारी पुढील गोष्ट नक्की सांगा!

To make your children goal-oriented like world champion Gukesh, be sure to tell them this Motivational story! | विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट!

विश्वविजेता गुकेशप्रमाणे आपल्याही मुलांना ध्येयनिष्ठ बनवण्यासाठी आवर्जून सांगा 'ही' बोधप्रद गोष्ट!

१८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून डी. गुकेश विश्वविजेता झाला. हे ध्येय गाठायचे हे त्याने बालपणीच ठरवले होते. त्यासंदर्भात अनेक मुलाखती आपणही पाहिल्या असतील. आजच्या रिल्स युगाचा प्रतींनिधी असूनही इतर मुलांसारखा वेळ वाया न घालवता त्याने आपले ध्येय निश्चित केले आणि साध्यही केले. यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्या परिश्रमाचे चीज झाले. आपल्याही मुलांनी त्यांच्या क्षेत्रात विश्वविजेता व्हावे असे वाटत असेल तर त्यांना पुढे दिलेली बोधप्रद कथा जरूर सांगा!

एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्याला धनुर्विद्येच्या प्रशिक्षणाकरिता बोलावून घेतले. वास्तविक पाहता शिष्याचे सर्व धडे गिरवून झाले होते. याआधी गुरूंच्या धनुर्विद्येचे सादरीकरणही त्याने अनेकदा पाहिले होते. तरीदेखील गुरुआज्ञा पाळण्यासाठी तो गुरूंनी बोलावलेल्या वेळी आणि बोलावलेल्या जागी पोहोचला. 

गुरूंच्या खांद्यावर धनुष्य आणि हातात बाण होते. गुरूंनी दूरवरच्या एका झाडावरील फळावर निशाणा धरायचा असे ठरवले. हा प्रयोग सुद्धा गुरूंनी अनेकदा यशस्वीपणे पार पाडला होता. मग आज नवीन काय शिकायला मिळणार याबद्दल शिष्याच्या मनात कुतूहल होते. नेहमीच्या जंगलात सरावाच्या ठिकाणी पोहोचल्यावर गुरूंनी शिष्याच्या हाती एक रुमाल दिला आणि तो त्यांच्या डोळ्यावर बांधायला सांगितला. शिष्याने तो बांधला. 

गुरुजींनी बाण धनुष्यावर चढवला आणि झाडाचा वेध घेऊन सोडला. बाण सोडल्यावर त्यांनी डोळ्यावरचा रुमालही काढला आणि आपला नेम अचूक लागला की नाही हे बघायला शिष्याला पाठवले. शिष्य उत्सुकतेने गेला. दूर वर पोहोचूनसुद्धा त्याला बाण आढळला नाही आणि फळही आढळले नाही. बराच वेळ शोधून तो परतला. गुरुजींनी त्याला विचारले, 'अचूक बाण लागला ना?'शिष्य मान खाली घालून म्हणाला, 'नाही गुरुजी, यंदा बहुतेक नेम चुकला. फळच काय, मला बाणही आढळला नाही.'
गुरुजी म्हणाले, 'वेड्या यात नाराज होण्याचे काय कारण? आज हाच धडा शिकवायला तुला बोलावले होते.'

शिष्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघत गुरुजींनी खुलासा केला, 'आज माझा नेम चुकला कारण माझं ध्येय मी पाहू शकत नव्हतो. आपल्याला आपल्या आयुष्याचे ध्येय दिसत नसेल तर हवेत सोडलेले बाण असेच भरकटत जातील. म्हणून डोळ्यावर पट्टी न बांधता उघड्या डोळ्यांनी आधी ध्येय निश्चित कर. त्यादृष्टीने प्रयत्न कर. ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तर आणि तरच तुझा नेम अचूक ठरेल!'

हा पाठ आपल्यालाही आयुष्यातील ध्येय निश्चितीचे महत्त्व सांगून जातो. आपण रोज उठतो, जेवतो, झोपतो पण या पलीकडे आपण आपले ध्येय निश्चित केलेच नसेल तर अशा रोजच्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून रोज नवीन ध्येय, नवीन स्वप्नं उराशी बाळगून दिवसाची मस्त सुरुवात करा आणि ध्येयाच्या दिशेने अचूक आणि अविरत मेहनत करा. 

Web Title: To make your children goal-oriented like world champion Gukesh, be sure to tell them this Motivational story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.