तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:04 IST2025-08-08T11:01:48+5:302025-08-08T11:04:28+5:30
Third Shravan Shanivar 2025: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच काही शनि संबंधित उपाय करणे रामबाण मानले गेले आहे. जाणून घ्या...

तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
Third Shravan Shanivar 2025: चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू आहे. ०९ ऑगस्ट २०२५ हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन, राखी पौर्णिमा हा अगदी जिव्हाळ्याचा सण साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात, आनंदात साजरे केले जाते. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण शनिवारी रक्षाबंधन आले आहे. श्रावण महिन्यातील व्रतांमध्ये शनिवारी आवर्जून अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, शनिचा ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशा लोकांनी हनुमंतांच्या पूजनासह शनि संबंधित काही उपाय करणे उपयुक्त मानले जाते. जाणून घेऊया...
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसे नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा काही ठिकाणी केल्या जातात. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.
आताच्या घडीला कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे?
विद्यमान स्थितीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह देव मीन राशीत विराजमान आहे. मीन राशी स्वामी गुरू आहे. आताच्या घडीला शनि मीन राशीत वक्री असून, नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहे. शनि मीन राशीत जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे. शनिवार या दिवसावर शनिचा अंमल असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी शनि उपासना, नामस्मरण करणे उत्तम मानले जाते. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असणाऱ्यांनी नेमके काय करावे?
शनि आणि हनुमंतांचे उपाय ठरतील रामबाण
- शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.