Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:15 IST2025-04-17T17:14:48+5:302025-04-17T17:15:40+5:30

Think Positive: तंत्रज्ञान युगात जग इतक्या वेगाने पुढे जात आहे की, आपण एकटे पडत असल्याची जाणीव प्रत्येकाला होत आहे, त्यावर उपाय म्हणजे हा लेख... 

Think Positive: Keeping yourself happy is a big challenge today; which even AI cannot do; but... | Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 

Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक

आपण आपल्या मनाला सतत कशात तरी अडकून पडायची जणू सवयच लावलेली आहे. सहज काहीच सुटत नाही आणि आपली सोडायची मानसिकतासुद्धा नसते. आपण सगळे जमा करून ठेवतो मग त्या घरातील अनेक वस्तू, कपडे असोत की मनातील आठवणी आणि नको नको ती माणसे सुद्धा! वास्तू शास्त्र सांगते की ६ महिने एखादी गोष्ट वापरली नाही तर टाकून द्या, घरात अडगळ करून ठेवू नका. जसे की जुनी, न चालणारी घड्याळे , कपडे, दोऱ्या, पेपरची, दुधाच्या पिशव्यांची रद्दी...द्या सगळे टाकून! मात्र अशा अवस्थेत द्या, की समोरचा अजून ६ महिने ती वस्तू वापरू शकला पाहिजे. पण नाही, सगळे उराशी कवटाळून बसायचे. घरात चार घड्याळे असतात आणि प्रत्येक घड्याळात वेगवेगळे वाजलेले असतात मग घरातील चार लोकांची मते सुद्धा चार वेगवेगळीच असणार की नाही?

असो! तर सांगायचे असे, की मनाला आता ह्या सगळ्यात अडकवून ठेवू नका, मागचे मागे सोडून द्या आणि पुढे चालत राहा. पुढे मोकळे आकाश आपल्याला गवसणी घालू पाहते आहे, खूप नवीन अनुभव अजून घ्यायचे आहेत, खूप लोक भेटायचे आहेत, नवीन बंध जुळायचे आहेत, पुढचे आयुष्य तुमची पुढील वळणावर आतुरतेने वाट पाहत आहे. पण आपण, हा नाही बोलत, तो नाही बोलत, ह्याने असे केले आणि त्याने असे केले ह्यातून बाहेरच नाही पडत...सोडून द्या! 

जो आपला असेल तो आपल्यासोबत असणारच आहे, इतरांची पर्वा आपण का करायची? कारण, आज कामापुरता माणसांचा वापर करण्याची पद्धत आहे.  जुने जाईल तेव्हाच नवीन येईल. पाणी जेव्हा वाहते असते, तेव्हाच ते पिण्याजोगे असते. नाहीतर त्याचे डबके होते. जुना ड्रेस द्या आणि नवीन आणा . सगळे जुने टाकून द्या आणि नवीन गोष्टीनी घर सजवा. जुन्या आठवणी क्लेशदायक असतात किती दिवस तिथेच अडकून पडणार आपण? शेवटी ज्याचे त्याचे कर्म आपल्यासोबत! किती आणि काय काय मनाला लावून घ्यायचे आणि कशासाठी? लोक मजेत आनंदात जगत आहेत, मग आपणच आपल्या मनाला दुःख देत देत का जगायचे?  वरचा बसला आहे आणि तो सगळ्याचा हिशोब वेळ आली की करतोच आणि तो त्याचाच अधिकार आहे, ह्यावर माझा विश्वास आहे!

आज समुपदेशन करताना लक्षात येते, की लोक त्यांनी मन:शांती गमावून बसले आहेत, त्याच त्याच पाशात अडकली आहेत, त्यामुळे आयुष्य जगायचेच विसरून गेली आहेत . तुम्ही कितीही चांगले वागा हा समाज तुम्हाला जगू देत नाही हे सत्य आहे . कुणालाही कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही मग अशी लोक कश्याला हवी तुमच्या मित्र यादीत ? काय संबंध ? अचानक बोलणे बंद करणे अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाणारी माणसे आपल्या मनाचा क्षणभर सुद्धा विचार करत नाहीत मग आपण सुद्धा त्यांचा का विचार करायचा? ती आपली कधीच नव्हती . आपण आपले मुक्त नक्कीच जगू शकतो का नाही ? प्रयत्न करून बघा नक्कीच यशस्वी व्हाल. आज रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी मोठमोठाली आव्हाने आहेत. 

आजची तरुण पिढी प्रचंड स्ट्रेस मध्ये जगत आहे , मुला मुलींची लग्नाची वये खूप पुढे गेली आहेत. काही मुले तर इतरांचे अनुभव ऐकून लग्न नकोच म्हणतात. आज लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे. कारण जबाबदारी कुणाला नको आणि आपण एकटे जगू शकतो हा पराकोटीचा अहंकार. पण हा विचार अजून १० वर्षांनी टिकणारा नाही, तेव्हा वय निघून गेलेलें असेल.

आपल्याला देवाने दिलेले २४ तास खूप काही करायला पुरेसे आहेत. त्यातच स्वतःला आनंदी ठेवणे हे आजचे मोठा चॅलेंज आहे, पटतंय का? कारण,अर्ध आयुष्य दुसऱ्याला काय वाटेल ह्यातच व्यतीत झाले आहे. आयुष्यभर साडी नेसणाऱ्या काकूनी खरंच एकदातरी ड्रेस घालून बघावा, मग बघा त्या बदलेल्या वस्त्राबरोबर त्यांना किती मोकळे ढाकळे वाटेल! अशीच मनावर असंख्य वर्ष चढलेली नको नको त्या आठवणींची  पुटे,  जळमटे सुद्धा दूर करा, मनाची साफसफाई करतच पुढील आयुष्याचा प्रवास करुया. नाहीतर जगातील सगळे आजार होतील. माणसाचे मन आजारी पडते आणि मग शरीर, म्हणूनच मनाला आनंदी ठेवण्याचा ध्यास घ्या.

नवीन वर्षात कुठलेही संकल्प करू नका कारण ते चोवीस ताससुद्धा टिकत नाहीत. चालायला जायचे आहे ना? शुभस्य शीघ्रम .उठा आणि चालायला जा, ठरवू बिरवू काही नका. आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जपा, आपल्या मताला सर्वप्रथम आपणच किंमत द्यायची असते तरच इतर देतील. केलेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा, तरच मन शांत होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल. दुसऱ्याला दोष देत बसू नका ,खूप झाले ते आता. कायम दुसऱ्यावर अवलंबून रहायची सवय सोडून दिली पाहिजे. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यात फरक आहे, जो कित्येकांना समजत नाही, कारण ते समजून घेण्याचा समजूतदारपणा नसतो. पण आपण आपली मते ठामपणे मांडायला शिकले पाहिजे. आपण एकटे येतो आणि एकटेच जाणार आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे, जे बदलणार नाही त्यामुळे स्वतःचे छंद जोपासा. कशाला कायम सतत कुणीतरी हवे बरोबर? आज जितकी कमी माणसे आपल्यासोबत आणि जितक्या कमीतकमी बातम्या तितके आपण सुखी. आज घरात कुणी विचारत नाहीत म्हणून फेसबुकवर गर्दी करणारे अनेक आहेत ,सतत कुणालातरी शोधत राहणारे ,सगळेच नाहीत पण आहेत . 

अहो प्रत्येकाला दुःख आहे, फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे, म्हटलेच आहे ना, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' जीवन जगून खूप झाले, पण आपल्या स्वतःच्या मनात त्याच्या अंतरंगात डोकवायचे राहूनच गेले. मला काय हवे आहे? मला काय वाटते, हे सगळ्यात महत्वाचे आहे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख आणि आपल्या ह्या जन्माचे प्रयोजन अति महत्वाचे आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपासना, साधना आणि ध्यानातून नक्कीच मिळतील निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. आपल्याला जे करायचे ते आपण बरोबर करतो आणि जे करायचे नाही त्यासाठी १०० कारणे सांगतो. बघा विचार करा. 

आपल्या मनाचा कल कुठे आहे ते आपल्याला माहित असते, वाचन, लेखन ह्यांनी सैरावैरा पळणारे मन नक्कीच शांत होईल. आपली विचारधारा पक्की असणे , नियत साफ असणे आवश्यक आहे. देवाने सगळ्यांना संधी दिली आहे, पण आपण त्याचा उपयोग किती करतो ते आपल्या हातात आहे. आज कुठलाही विषय किंवा क्षेत्र घ्या अत्यंत वाईट स्पर्धा, दुसऱ्याला खाली खेचण्याची मनोवृत्ती सर्व आहेच पण ह्यातूनही आपल्याला आपला प्रवास आनंदी करायचा आहे हे आव्हान आहे. यशाचे  शिवधनुष्य पेलण्याची जिद्द आपण ठेवायचीच आहे कारण आपले सद्गुरू अनंत हाताने आपल्या मागे उभे आहेत .

मी तर माझे सर्व जीवन त्यांना समर्पित केले आहे . माझा त्या शक्तीला साष्टांग दंडवत आहे , अगदी कशाचाही विचार मी करत नाही, त्यांच्या इच्छेत सर्व इच्छा विलीन केल्या आहेत . समोरचा बोलला आपण बोलायचे नाही बोलला नाही बोलायचे . इतके साधे सोपे जगायला महाराजांनीच मला शिकवले आहे. वेळ भरभर निघून जातोय आणि आपले एकेक पाऊल मृत्यूकडे जात आहे म्हणूनच हा वेळ सार्थकी लावणे महत्वाचे आहे. काय वाटते ? आपण आनंदी असतो तेव्हा सर्व जग सुंदर वाटत राहते आणि निराश उदास असतो तेव्हा जगूच नये असे वाटते. उंबरठ्याच्या बाहेर जग सुरु होते आणि तिथे आपले कुणीही नसते, पण त्याच्या आत आपली माणसे असतात, ज्यांच्याप्रती आपली काही कर्तव्येही असतात. ती पूर्ण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे, त्यामुळे समाजकारणात आणि राजकारणात किती अडकून पडायचे हे आपण ठरवायचे. शेवटी ज्याच्या खिशात पैसा त्याला मान हे आजचे समीकरण आहे. लष्करच्या भाकऱ्या भाजून आपल्या कुटुंबाचे पोट भरणार नाही आणि कुणी आपल्याला दमडीही देणार नाही हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.  

ठरवायचे काहीच नाही पुढे जात राहायचे. एखादी गोष्ट कृतीत उतरवणे महत्वाचे. आज आयुष्यात खूप काही करण्यासारखे आहे. रोज एकाला तरी हसवा , कुणाच्या दुःखावर किंवा व्यंगावर हसण्यापेक्षा हे बरे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी निदान एक तरी घटस्फोट वाचवा, एकाचे तरी गुणमिलन मस्त करून द्या. खरे ज्ञान द्या . घटस्फोट  झालेली माणसे वाईट नसतात फक्त दोन वेगळा विचार करणारी माणसे एकत्र आलेली असतात. मार्केटिंग अजिबात नको, फसवणूक नको. लोक हुशार आहेत, त्यांना ते समजते आणि आपली पत जाते त्यापेक्षा सत्य आपला ठसा उमटवून जाते तोही कायमचा! आज मार्केटिंगचा जमाना आहे. जो दिखता है वह बिकता है.  पण लोकांकडून किती पैसे उकळायचे आणि किती टोप्या घालायच्या?  सतत कुढत बसणे, जीवनात घडलेल्या वाईट आठवणी , प्रसंग, माणसे ह्यांच्याभोवती रुंजी घालत बसणे म्हणजे स्वतःच्याच हाताने आयुष्याची माती करणे. इथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही . 

१२ राशींची माणसे ह्या जगात आहेत,काही मनाला लावून घेणारी आहेत, तर काही आपल्याच स्वप्नांना पंख लावणारी आहेत. चला तर मग आपणही नवनवीन स्वप्ने बघुया ती पूर्ण करण्यासाठी धडपड करुया. अविश्रांत कष्टाने यशश्री खेचून आणूया आणि स्वतःच्या असण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देऊया.

आज सोशल मिडीया प्रगत आहे त्याने खूप सुप्त लेखकाना जन्म दिला आहे. तुम्हीही आपले विचार शब्दबद्ध करा, लिहिते व्हा आणि विचारांना दिशा द्या. इतरांना प्रेरणा द्या . एखाद्या खळखळणाऱ्या धबधब्यासारखे आयुष्य जगा. डबके होऊन जगण्यात मजा नाही. जिवंतपणे कत्येक मरणे जगणाऱ्या लोकांना जीवन जगायची प्रेरणा द्या. 

दुसऱ्याचा द्वेष करून, हेवे दावे ,मत्सर करून ह्या जगात कुणीही सुखी झाले नाही आणि होणारच नाही . उलट आपणच मानसिक रुग्ण होतो. मनात महाराजांनाच आणून बसवले तर इतर टुकार विचारांना तिथे जागाच राहणार नाही. प्रयत्नपूर्वक हा प्रयत्न करून बघा. आज आर्थिक समस्या , विवाह , वास्तू , मुलांची शिक्षणे, व्यसने ,संतती न होणे अशा अनेक विचारांनी मनुष्य त्रस्त आहे. आपल्या जराशा स्मित हास्याने , दोन गोड शब्दांनी एखाद्याला जगायला स्फूर्ती मिळाली तर तो आनंद खरच अनमोल असेल. पटतंय का? मग लगेच कृती करूनच टाका .

हे वर्षच नाही तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तुम्हा आम्हा सर्वांसाठी “ अनमोल “ असुदे , स्वप्नपूर्तीचे , आकाशाला गवसणी घालणारे ,आरोग्यदायी , दुसऱ्याला आनंद देणारे, अध्यात्माची गोडी चाखत महाराजांच्या चरणाशी आयुष्य समर्पित करणारे असुदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सकारात्मक जीवन जगायची गुरुकिल्ली आपल्याचकडे आहे आता फक्त ती वापरायची आहे. 

माझा फोन आला नाही तर काळजीच्या स्वरात मला फोन करून माझी खुशाली विचारणाऱ्या, माझ्या लेखनाला सतत प्रेरणा देणार्या माझ्या गुरु ,सखी सौ. शिल्पाताई अग्निहोत्री ह्यांच्यापुढे मी नतमस्तक आहे. आजचा माझा हा लेख त्यांना समर्पित करताना विशेष आनंदही होत आहे. 

संपर्क : 8104639230

Web Title: Think Positive: Keeping yourself happy is a big challenge today; which even AI cannot do; but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.