Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:34 IST2025-05-03T17:19:54+5:302025-05-03T17:34:53+5:30

Temple: शिवमंदिराच्या पायरीवर, शिखरावर किंवा अनेक ठिकाणी घराच्या प्रवेशद्वारावर या राक्षसाची प्रतिमा आपल्याला दिसते, पण तो आहे कोण? जाणून घ्या!

Temple: Why is it customary to go to the temple after paying homage to 'this' demon on the steps of the Shiva temple? | Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

शिवालयात अर्थात शिव मंदिरात आपले अनेकदा जाणे होते, पण तिथल्या बारकाव्यांकडे लक्ष जात नाही. डोळसपणे पाहिले तर अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक खुणा आपल्याला मंदिरात सापडतील आणि त्यामागचा अर्थ जाणून घेण्याची जिज्ञासाही निर्माण होईल. चला तर आज शिवालयाच्या पायरीवर 'आ' वासून पाहणार्‍या या राक्षसाची गोष्ट आणि त्याचे अस्तित्त्व जाणून घेऊ. 

शिवालयाच्या पायरीवरचा हा राक्षस कोण?

तर... या राक्षसाचे नाव आहे कीर्तिमुख! भयावह वाटणारी त्याची मुद्रा शिवालयाच्या पायरीवर दिसून येते. पण ही जागा त्याला मिळाली कशी? तर, त्यामागे एक पौराणिक कथा आहे. एक योगी होता. तपश्चर्येच्या जोरावर त्याने वर मिळवला, ज्यामुळे तो मनात येईल ती गोष्ट जाळून खाक करू शकणार होता. एवढेच नाही तर त्याला अशा काही दिव्य शक्ती प्राप्त झाल्या होत्या, ज्या इतर कोणाजवळ नव्हत्या. अर्थातच त्यामुळे तो अहंकरी झाला. एकदा त्याने आपला हा शक्तिप्रयोग खुद्द भगवान शंकरांवर केला. त्यावेळी शंकर ध्यानमग्न अवस्थेत होते. योगीचा उन्माद पाहून त्यांच्या रागातून एक राक्षस निर्माण झाला, शंकरांनी त्याला योगीला खाऊन टाकण्याची आज्ञा केली. योगी महादेवाला शरण आला. माझी सगळी शक्ती तुमच्या पायाशी अर्पण करतो म्हणाला. महादेवांनी त्याला क्षमा केली आणि राक्षसाला निघून जायला सांगितले. आपल्या निर्मितीचा हेतू साध्य न झाल्याने तो महादेवाला म्हणाला, योगीला खाऊ नको ही आज्ञा तुम्ही दिलीत आणि परत घेतलीत, आता माझे आयुष्य हेतू विरहित कसे घालवू? त्यावर महादेव म्हणाले, तू स्वतःला खाऊन टाक! त्याक्षणी महादेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या राक्षसाने पाठमोरी झेप घेत स्वतःला खाऊन टाकले, पण त्याचे मुख शिल्लक राहिले. त्याचा तो असीम त्याग पाहून महादेव भारावले आणि त्याला वर दिला, तू तुझा देह संपवला तरी तुझ्या मुखाची कीर्ती कायम राहील आणि तू कीर्तिमुख म्हणून माझ्या शिवालयाच्या पायथ्यावर, शिखरावर स्थान मिळवशील! तेव्हापासून या राक्षसाला वरदान मिळाले आणि तो सेवेत रुजू झाला. 

किर्तीमुखाला नमस्कार करण्यामागे हेतू काय?

शिव मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीवर असलेल्या किर्तीमुखाला नमस्कार करतो आणि मग शिवालयात जातो. कारण भगवान शंकरानी त्याची नियुक्ती भक्तांची पापं खाऊन टाकण्यासाठीच केली आहे. तिथे पाय पडताक्षणीच आपली पापे नष्ट होतात आणि प्रवेश द्वारावर असलेल्या गणपतीच्या आशीर्वादाने आपली मलीन बुद्धी स्वच्छ होते आणि निष्काम मनाने आपण शिव शंकराच्या सेवेत रुजू होतो. 

किर्तीमुखाच्या पायरीला नमस्कार करण्यामागचा तर्क :

मंदिराची पायरी ही देवाजवळ आपल्याला नेणारा दुवा असते. तिथे जो झुकून आतमध्ये प्रवेश करतो, त्याचा अहंकार लोप पावतो. देवाच्या द्वारी विनम्र होणे आणि किर्तीमुखाच्या तोंडी आपला अहंकाराचा नाश होऊन देवासमोर कृतज्ञ होणे हे देखील त्यामागील एक कारण असू शकते. 

घराच्या प्रवेश द्वारावर तसेच मंदिराच्या शिखरावरही असतात किर्तीमुखाच्या आकृती : 

भारतीय वास्तु शास्त्रानुसार भेसूर दिसणाऱ्या किर्तीमुखाला पाहून मनातील आसुरी विचारांचा नायनाट व्हावा हे त्यामागील कारण असते. अनेकांच्या घराच्या प्रवेश द्वारावरदेखील किर्तीमुखाची प्रतिमा टांगलेली दिसते. अज्ञानामुळे लोकांना ती फेंगशुई वास्तू शास्त्राचा भाग वाटते, पण तसे नसून आपल्या वाईट विचारांचा निचरा होऊन वास्तूमध्ये चांगल्या विचारांचाच प्रवेश व्हावा हे सांगणारी ती किर्तिमुखाची प्रतिमा असते. 

त्यामुळे आता शिवमंदिरात गेल्यावर आठवणीने किर्तीमुखाला नमस्कार करा आणि आपला अहंकार, पाप, द्वेष यांचा नायनाट होउदे अशी प्रार्थना करत बुद्धिदात्या गणरायाकडून सद्बुद्धी मागा आणि मगच भगवान शिवाचे दर्शन घ्या!

Web Title: Temple: Why is it customary to go to the temple after paying homage to 'this' demon on the steps of the Shiva temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर