Tarot Card: हा आठवडा अडलेली कामे पूर्णत्त्वास नेणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:48 IST2025-12-08T10:47:14+5:302025-12-08T10:48:02+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तसेच राशीनुसार तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: हा आठवडा अडलेली कामे पूर्णत्त्वास नेणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
७ ते १३ डिसेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, शक्ती आणि सामर्थ्य देणारा आहे. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी जे काही साधन लागणार आहे, ते तुमच्या पुढ्यात येणार आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील, इच्छाशक्ती भक्कम राहील. कोणतीही समस्या सोडवायला तुम्हाला योग्य मार्ग सुचतील. जरी तुम्ही एकटे असाल, तरी तुम्हाला सशक्त वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे संसाधनांचा योग्य उपयोग. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अतिवापर करू नका. बुद्धीने निर्णय घ्या, भावनांमध्ये अडकू नका. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी लवचिक आणि चपळ रहा. "जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" हे लक्षात ठेवून स्वावलंबी व्हा!
नंबर २: (राशी: मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर ३: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी पूर्णत्वाचा असणार आहे. कुठलेतरी काम एका टप्प्यापर्यंत पूर्ण होईल. काहीतरी मिळवल्याचे समाधान मिळेल. आहात त्या मार्गावर, भरपूर कष्ट करुन एखादे ध्येय साध्य होईल. घडून गेलेले बदल आता चांगल्या प्रकारे फळास येतील. एखाद्या त्रासातून, किंवा बंधनातून मुक्त व्हाल. प्रवासयोग संभवतात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला जे मिळेल ते मोठ्या मनाने स्वीकारण्याची गरज आहे. संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार ठेवा. सगळ्यांना सामावून घ्या. तुम्हाला जितके शक्य असेल तितके आनंदी मनाने एखाद्या गरजवंताला दान करा. सामाजिक कार्य करा. "जीना इसी का नाम है!" या गाण्याचे बोल आठवा आणि त्याप्रमाणे वागा!
संपर्क : sumedhranade90@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.