Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:37 IST2025-11-01T10:37:05+5:302025-11-01T10:37:48+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी किंवा राशीनुसार तुम्हाला तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेता येईल.

Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२ ते ८ नोव्हेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!
नंबर २: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुम्हाला बुद्धीचातुर्य दाखवण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्वाचे संवाद घडतील. कडक वागावं लागेल, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा नियम आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये नियोजनाचा, आराखडा तयार करण्याचा एक टप्पा गाठला जाईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. पक्षपात करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. स्पष्ट संवाद ठेवा. लोकप्रिय नको, न्यायप्रिय आणि नीतीप्रिय वागा.
नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत. सगळं असूनही काहीतरी नसल्याची भावना निर्माण होईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.