कोणी कितीही चिडवलं, तरी आपलं ध्येय कसं गाठायचं हे सांगताहेत स्वामी विवेकानंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:27 PM2022-07-04T14:27:56+5:302022-07-04T14:28:16+5:30

आपल्या जिवनाचे उद्दीष्ट आपल्याला कळले पाहिजे. ते कळण्यासाठी स्वत:ची ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वत:ला ओळखले, त्याने परमात्म्याला ओळखले.

Swami Vivekananda is telling you how to achieve your goal, no matter how much someone teases you! | कोणी कितीही चिडवलं, तरी आपलं ध्येय कसं गाठायचं हे सांगताहेत स्वामी विवेकानंद!

कोणी कितीही चिडवलं, तरी आपलं ध्येय कसं गाठायचं हे सांगताहेत स्वामी विवेकानंद!

googlenewsNext

एकोणिसाव्या शतकातील जगविख्यात संन्यासी, स्वामी विवेकानंद यांच्या ज्वलंत विचारांचा पगडा आजच्या तरुणांवरही दिसून येता़े  विचार करायला लावतील, अशा प्रेरक विचारांची पेरणी करणारे स्वामी विवेकानंद यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी! 

स्वामी विवेकानंद हे स्वत: आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सजग होते. आपल्या कृतीतून त्यांनी युवकांना बोध दिला, उठा, जागे व्हा. या पहिल्या दोन शब्दात ते काय सांगतात? तर आपण रोजच उठतो, परंतु ध्येयाप्रती जागे होत नाही. त्यामुळे उठूनही झोपल्यासारखे सुस्त असतो. आळशीपणा झटकून, अज्ञान, अंधश्रद्धा दूर सारून आपण ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. 

ध्येय कोणते? पहिले ध्येय म्हणजे आपल्या मुलभूत गरजा आणि सांसारिक जबाबदाऱ्या भागतील, यासाठी कष्ट करणे आणि दुसरे पण महत्त्वाचे ध्येय म्हणजे स्वत:ची ओळख करून घेणे. लोक पहिल्या ध्येयात एवढे गुंतून जातात, की दुसरे ध्येय गाठायचे त्यांच्या लक्षातच राहत नाही. ते तिथेच थांबून जातात आणि हीच आपल्या आयुष्याची इतिश्री समजतात. म्हणून वरील दोन शब्दांना तीसरी जोड देत स्वामीजी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! 

आपल्या जिवनाचे उद्दीष्ट आपल्याला कळले पाहिजे. ते कळण्यासाठी स्वत:ची ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वत:ला ओळखले, त्याने परमात्म्याला ओळखले. कारण, तो आपल्या आतच आहे. ही ओळख पटलेल्या व्यक्तीसाठी जगात भेदभाव उरतच नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उपस्थित सर्वांना उद्देशून 'प्रिय बंधू आणि भगिनिंनो' असे उच्चारताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. कारण 'आपण सगळे एक आहोत' हीच प्रत्येक धर्माची मूळ शिकवण आहे. ती स्वामीजींनी एका वाक्यात दर्शवून दिली.

स्वामीजी शिकागोला जाणार, त्याआधी त्यांनी आपल्या गुरुपत्नी माता शारदा यांची भेट घेतली व आपण धर्मप्रचारासाठी जात आहोत असे सांगून आशीर्वाद घेतला. शारदा मातेने आशीर्वाद दिला आणि ओट्यावर ठेवलेली सुरी द्यायला सांगितली. स्वामीजींनी ती दिली. ती हाती घेतल्यावर त्या म्हणाल्या, `धर्माची शिकवण देण्यासाठी तू परिपूर्ण झाला आहेस, यशस्वी हो.' या एका कृतीतून शारदा मातेने केलेले भाकित ऐकून स्वामीजी विचारात पडले. त्याची उकल करताना शारदा माता म्हणाल्या, `सुरी देताना, तिची धारदार बाजू स्वत:कडे धरून आपल्या हाताला लागेल की नाही याचा विचार न करता, ती तू स्वत: कडे धरलीस आणि सूरीची मूठ माझ्याकडे सोपवलीस. याचाच अर्थ धर्माची धार आणि समाजाचे आघात पेलण्यासाठी तू सक्षम आहेस आणि लोकांच्या हाती धर्माची मूठ पकडवून देण्यासाठी तू परिपूर्ण झाला आहेस.

छोट्या छोट्या कृतीतून स्वामींच्या मोठ्या कार्याचा परिचय होतो. स्वामींनी केलेले धार्मिक कार्य, युवाशक्तीला मार्गदर्शन, भारतीय संस्कृतीचा परदेशात वाजवलेला डंका, यासगळ्याच गोष्टी अद्वितीय आहेत. याचे कारण, त्यांनी स्वत: मधील परमात्म्याला ओळखले होते. ते म्हणत, भगवंत त्यालाच मदत करतो, जो प्रयत्न करतो. प्रयत्नांती परमेश्वर! तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत आणि असेल माझा हरी म्हणत बसून राहिलात, तर ती तुमची भगवंतावरी श्रद्धा नाही, तर ती अंधश्रद्धा आणि आळस आहे. तुम्ही जर प्रयत्न केलेत आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या परमेश्वरावर सोडल्यात, तर भगवंत तुमच्या प्रयत्नांना अवश्य यश देतो. कारण तुम्ही केवळ देवावरच नाही, तर स्वत:वर देखील विश्वास दाखवलेला असतो. हाच विश्वास तुम्हाला स्वत:ची ओळख करून देतो. ही ओळख पटेपर्यंत थांबू नका, झोपू नका, कार्यमग्न व्हा, हीच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची फलश्रुती, असे म्हणता येईल.

Web Title: Swami Vivekananda is telling you how to achieve your goal, no matter how much someone teases you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.