Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:25 IST2025-04-25T17:24:42+5:302025-04-25T17:25:26+5:30

Swami Samartha: स्वामीभक्ती करावीशी वाटणे हीसुद्धा स्वामीकृपाच; पण स्वामी भक्ती कशी करत आहोत, त्यामुळे कोणते बदल झाले याची जाणीव करून देणारा लेख!

Swami Samartha: These are the changes that occur in our lives after receiving the grace of Swami; have you also experienced this? | Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?

Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

“स्वामींची सेवा करावी तरी कशी?'' असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो. मी नामस्मरण करू की पोथी वाचू? मी स्मरण करू कि मानसपूजा करू? की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ? 

मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्वसुकृतसुद्धा बळकट असावे लागते, तरच संत चरण लाभतील . सेवा करायची आहे, एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे ह्याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात सुस्पष्ट हवे. ज्या देवतेचे स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम, माया आणि श्रद्धा हवी, संपूर्ण शरणागत होवून समर्पित व्हावे, मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून!

अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का? देखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी जातोय का? की तळमळीने ८.२३ ची ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही, इतक्या आर्ततेने दर्शनाला जातो आहे? प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की कसे? हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा, काय काय उत्तर मिळतात ते! हे प्रश्न स्वतःला विचारायला सुद्धा धाडस लागते!

आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे, डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते. सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आ वासून उभे असते.  ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे मनच कौल देते.

हार तुरे पेढे काहीच नकोय त्यांना, ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी. एक क्षण उभा राहा माझ्यासमोर तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळेभरून बघू तरी, इतकेच हवे आहे त्यांना . तो क्षण भरभरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस इतकेच मागत आहेत ते आपल्या कडे. जीवनातील भौतिक सुख हवीत पण आयुष्यभर ती मागत राहिलो तर जीवन संपून जाईल पण मागण्या संपणार नाहीत. आपल्या दोघात मागणे हे नकोच. हवे आहे ते प्रेम निस्वार्थी प्रेम आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात. खरं सांगा प्रगट दिन असो अथवा इतर काहीही दिवसभरात इतकी सजावट, पै पाहुण्यांची सरबराई करताना एक क्षणभर तरी आपण त्यांचे होतो का? क्षणभर तरी त्यांच्या चरणाशी विसावतो का? त्यांना डोळे भरून पाहतो का? त्यांचे असणे आपल्या वास्तूत अनुभवतो का? नाही खरच नाही. त्यांचे आपल्याजवळ असणे हेच तर आपले आयुष्य आहे. ते आहेत म्हणून चार लोक आपल्याकडे येत आहेत केवळ त्यांच्यासाठी , आपल्यासाठी नाही हे लक्षात आले पाहिजे. ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणूनच सर्व काही आहे. 

स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर महाराज मला भेटत आहेत . वयाच्या पंचविशीत की पन्नाशी ओलांडल्यावर? नक्की कधी? अंतर्मुख व्हा आणि विचारा स्वतःलाच हे प्रश्न. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत, मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे.

अध्यात्म नेमके काय आहे? मला का ह्यात यावेसे वाटले ? कुणी किंवा कुठल्या प्रसंगाने भारावून ओढल्यासारखा आलोय मी ? कुणीं आणले की मी स्वतः आलोय ? भास होत आहेत का त्यांचे ? जवळ असलेल्या त्यांच्या शक्तीची अनुभूती मिळतेय ? आजवर आयुष्य कसे गेले ? काय मिळवले आणि काय गमावले? सगळे लक्ख डोळ्यासमोर आहे. एका क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरून जातोय आणि समजत आहेत आपण केलेल्या चुका , अपराध , केलेला आळस आणि अपमान, जे कधी आपण केले तर कधी आपले झाले. 

महाराजांचे अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे , कसे आहे? नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे ही तर खरच कसोटी आहे. नामस्मरण सुरु झाले की आपल्यातील दोष स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्यात अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते. देह सर्वत्र आणि आत्मा मन त्यांच्या चरणी अशी अवस्था प्राप्त होते . आपल्यातील अहंकार लोप पावू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते , घेणे मागणे अपोआप कमी होत जाते. 
 
सततची जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकण्यासाठी केलेला संघर्ष ह्यातून दोन सुखद क्षण गुरुपदी अनुभवणे हा खास अनुभव म्हणावा लागेल. आज मनुष्याने सर्व काही कमावले आहे पण मनाची शांतता घालवली आहे. सुखाची इतकी लालसा कि नेमके सुख गुरूंच्या चरणाशी आहे ह्याचाही जणू विसर भक्ताला पडावा इतकी आहे. अंतर्मुख व्हा दीर्घ श्वसन करा. श्वास ही  एकमेव गोष्ट आहे ज्याकडे आपले संपूर्ण दुर्लक्ष आहे. आता त्याकडेच लक्ष देऊन ध्यानस्थ व्हा आणि सर्व काही त्यांच्यावर सोपवा. तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची ते तेच ठरवतील नव्हे तो त्यांचाच अधिकार आहे. 

हम गया नही जिंदा है... ह्याची प्रचीती क्षणोक्षणी आहे. कुणाचीही ओंजळ रिती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत ते घालणार आहेतच त्यामुळे मागणे आता काहीच उरणार नाही . त्यांचा सहवास लाभणे , चांगले विचार मनात रुजणे , दुसऱ्याला मदत करायची बुद्धी होणे , सतत दुसऱ्याचा तिरस्कार , मत्सर ह्यातून निर्माण होतात ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परावृत्त होणे ह्यासाठी आज मनापासून अंतर्मुख झालात तर तुमची आभाळाइतक्या  चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील. 

काहीतरी कुठेतरी राहून गेले आहे. नक्की काय ते शोधा. कुणाचे पैसे द्यायचे राहून गेले आहेत ( मुद्दामून कि अनावधानाने ) ?, कुणाचा अपमान केलाय ? कुणाची बदनामी केली आहे? कुणाची निंदा ? कुणाच्या दुःखाला कारणीभूत ठरला आहात ? नक्की काय ? विचारा आपल्याच मनाला आणि बघा कशी सोळा नंबरी सोन्यासारखी खरी उत्तरे मिळतील आणि डोळे खाडकन उघडतील. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याचपाशी आपल्याच कृतीत आहे . महाराज महाराज केले की सर्व चांगले झाले पाहिजे. आळशी झालो आहोत आपण, जरा उतार नको आपल्याला, सतत यश हवे आहे. हव्यास वाईट असतो. घर आहे पण मोठे हवे, मग बंगला, अजून हवे, अजून हवे... हे हवे हवे न संपणारे आहे आणि आपण जीव तोडून ह्या हव्यासापोटी धावत आहोत. ज्या महाराजांच्या चरणाशी त्यांच्या सान्निध्यात आनंद आहे, परमोच्च सुख आहे, तिथे नको जायला आपल्याला! कारण महाराजांच्या चरणाशी गाद्या गिरद्या, एसी, सर्व सुखाची साधने नाहीत उंची अत्तरे नाहीत की  मेजवानी नाही. पण आयुष्याच्या संध्याकाळी आपण शोधत असणारी शांतता मात्र त्यांच्याच चरणाशी आहे आणि शेवटी ती शोधत आपण तिथेच पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे . 

आज एसीमध्ये झोपून रात्रीची झोप नाही. आपण सगळ्या जगाला फसवू पण आपल्या मनाला नाही. का झोप येत नाही? कारण अनेक चुकीच्या कर्मांचे मणामणाचे ओझे आहे मनावर. माफी मागा, सगळ्यांशी प्रेमाने वागा झोप नक्की येणार . मुळात आपले कुठेतरी चुकले आहे ते स्वीकारा . बस इतकेच करायचे आहे आपल्याला जे कठीण आहे. 

२६ एप्रिल २०२५ रोजी आपल्या गुरूंचा महानिर्वाण दिन आहे. स्वीकारा, सर्व काही जे जे केले आहे मग ते चांगले वाईट काहीही असो , केलेल्या सर्व कृत्यांची जबाबदारी घ्या . कुणाला दुखावले असेल त्यांची माफी मागा, तरच महाराज सुद्धा माफ करतील. आणि त्यांच्या चरणी आपला प्रपंच वाहा. बुद्धी देणारे तेच आहेत शेवटी करते आणि करवते सुद्धा! ह्यावर दृढ निश्चय ठेवा आणि समर्पित व्हा. हाच तो क्षण ज्याने आपले जीवन कात टाकल्यासारखे बदलून जाईल. आनंदाला बहार येईल आणि आशेला नवीन पालवी फुटेल. जीवन घडवण्यासाठी मिळालेली ही सुवर्णसंधी आहे आणि त्याचा उपयोग करून घेणे निव्वळ आपल्याच हाती आहे. 
दुषित कर्मे जीवनात पाठ सोडत नाहीत म्हणून कर्म करताना महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे , त्यांना हे आवडेल का? हा प्रश्न सतत मनाला पडला पाहिजे आणि त्यानुसार आपले वर्तन असायला हवे. 

स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजांच्या सेवेत निरंतर दाखल होतो ह्यात वाद नाही . पुण्यस्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण , सतत त्यांचा ध्यास , त्यांच्याच विचारात जीवन व्यतीत करणे म्हणजेच खरी सेवा .

श्री स्वामी समर्थ 

संपर्क : 8104639230

Web Title: Swami Samartha: These are the changes that occur in our lives after receiving the grace of Swami; have you also experienced this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.