Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:56 IST2025-04-25T11:56:31+5:302025-04-25T11:56:43+5:30

Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, या निमित्ताने स्वामी उपासना सुरु करण्याचा विचार करत असाल तर एकदा स्वामींचा आदेश वाचा!

Swami Samartha: On the occasion of Swami's death anniversary, know the orders, worship and resolutions given by Swami to his devotees! | Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 
             
गुरुविण जीवनात कोण येईल कामी, खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी
जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, गुरुपदी घेवू चला क्षणभर विश्रांती ...

आज दत्तसंप्रदायात सेवेत असणारे लाखो भक्त आहेत. ७-८ वर्षापूर्वी अक्षरशः खेचून घेतल्यासारखा माझा श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाण्याचा योग आला आणि जीवन कृतार्थ झाले. माझ्या आत्ते सासूबाई सौ. उषाताई आपटे यांनी सर्वप्रथम श्री. गजानन विजय ग्रंथ माझ्या हातात दिल्यामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. त्यांनतर अनेक ग्रंथांचे वाचन ईश्वरी कृपेने झाले. प्रत्येक गोष्टीची आयुष्यात वेळ ठरलेली असते त्याप्रमाणे माझ्या ह्या अध्यात्मिक प्रवासालाही तेव्हापासूनच सुरवात झाली. माझा श्वास असणाऱ्या माझ्या गुरुंचा समाधी दिन असला तरी “ हम गया नही जिंदा है “ ह्या स्वामी महाराजांच्या वचनाचा प्रत्यय त्यांच्या सर्व भक्तांना आजही प्रत्येक क्षणी येत आहे. महाराजांविषयी मी पामर काय लिहिणार..खरतर “स्वामी'' ह्या एका शब्दातच जीवनाचा सखोल अर्थ दडलेला आहे.  तू सगळा अहंकार मीपणा सोडून तो स्वाहा करून त्याची आहुती देवून माझ्या चरणाशी ये आणि मग पहा मी तुझे जीवन कसे आनंदाने फुलवतो असे तर त्यांना त्याना आपल्या भक्तांना सांगायचे नसेल ना..

Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!

स्वामी समर्थ ,गजानन महाराज ,साईबाबा ,गोंदवलेकर महाराज ,शंकर महाराज ही नावे जरी वेगळी असली तरीहि शक्ती ,गुरुतत्व एकच आहे आणि त्यांच्या लीला आपल्या सामान्य भक्तांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते आहे खरतर हे आपले अहोभाग्य म्हटले पाहिजे. स्वामींनी स्वतः सांगितले आहे “अनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् “ म्हणजे जो माझी अनन्यभावे सेवा करेल त्याचा योगक्षेम अर्थात प्रपंच मी स्वतः चालवीन.

आजकालच्या आपल्या रुटीनमध्ये तासंतास नामस्मरण ,पूजा करणे शक्य नसले तरीही रोज आपल्या हातून काहीनाकाही सेवा करून आपला पुण्यसंचय झाला पाहिजे'. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' ह्या युक्तीला धरून खरोखरच अंतर्मानापासून स्वामींना हाक मारून तर पहा, तत्क्षणी धावून येतील ते, हा माझाच काय आपल्यापैकी कित्येक वाचकांचा अनुभव असेल. अहो ते द्यायलाच बसलेले आहेत, फक्त आपल्याला घेता आले पाहिजे आणि त्यासाठी मनाचे शुद्धीकरणही हवे...अध्यात्माचे संस्कार आपल्या मनात खोलवर रुजायला हवेत..आपली मनापासून केलेली सेवा ही त्यांच्या चरणाशी रुजू होतेच होते.. ही सेवाही अपेक्षा विरहित असावी ..

खरंतर हे सर्व लिहायला सोपे आहे. प्रत्यक्षात तसे होत नसले तरी प्रयत्न जरूर करावा.शेवटी आपण सामान्य माणसे..प्रपंचातील अडचणीनी माणूस त्रस्त होतो आणि शेवटी परमेश्वर चरणी नतमस्तक होतो. कुठल्यातरी गोष्टीची मनी आस धरून सेवा करूच नये, महाराजाकडे भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक सुख मागावे हे मला इतक्या वर्षांच्या सेवेने समजले आहे. कुणाच्याही डोळ्यातून पाणी न काढता जगा परमेश्वर अनंत हाताने तुम्हाला द्यायलाच बसला आहे..जीवनातील भोग हे शेवटी भोगूनच संपवायचे आहेत आणि ते भोग सुसह्य व्हावेत ह्यासाठी तर अध्यात्म आहे. आपल्याला कधी काय द्यायचे ते त्यांच्या इतके चांगले अजून कुणास समजणार? कारण त्यांनीच तर घडवले आहे आपल्याला ..अहो आपल्या बुद्धीची झेप असून ती कितीशी असणार आहे. ज्यांचे आपल्या श्वासावरही अधिराज्य आहे त्यांच्याकडे काय मागायचे .. आपण कितीही काही मागितले तरी स्वामी आपल्याला काय हवे आहे त्यापेक्षा जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देणार ह्यात तिळमात्रही शंका मनी असू नये.

पण तरीही आपले त्यांच्याकडे मागणे अविरत चालूच असते. आपले सर्व अवयव धड आहेत मग अजून मागण्यासारखे काहीच राहिले नाही. स्वामींनी सांगितले आहे “शेत पिकवून खा. आयते बसून खाणाऱ्यांवर स्वामींची कृपा होणे कठीणच. आपण लहान भांडे घेऊन गेलो आणि नशिबात त्यापेक्षा जास्त असेल तर ते भांडे ओतप्रोत भरून वाहू लागेल आणि मोठे भांडे घेऊन गेलो तर वाटेल अर्धेही भरले नाही, तेव्हा शेवटी त्या परमेश्वराकडे किती आणि काय मागायचे ह्यालाही मर्यादा हवीच. सर्वात महत्वाचे म्हणजे नखशिखांत असलेला मी पण गेला पाहिजे. जो आपल्यात ओतप्रोत भरलेला असतो. अहं गेल्या शिवाय परमेश्वर प्राप्ती नाही हे निश्चित. ८४ लक्ष योनीतून मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि मिळालाच तर तो सार्थकी लागणे त्याहून कठीण. संपूर्ण आयुष्य सेवेत राहून आपल्या मनावर चढलेली ही स्वार्थाची ,अहंकाराची पुटे नष्ट होईपर्यंत आपली इहलोक सोडायची वेळ येते. मनुष्याने कायम साधनेत ,नामात राहावे. साधनेतून लागते ती समाधी आणि ती एकदा लागली की आपण आपले राहातच नाही. जन्माचे सार्थक होते आणि आनंदाची जणू समाधीच लागते, आनंदाचे डोही आनंद तरंग अशी मनाची अवस्था झालेल्या मनास सुख दु:खाच्या, मोहमायेचा सगळ्याचा जणू विसर पडतो आणि तिथेच भेट होते ती आपल्या सद्गुरूंची.

Swami Samartha: स्वामींना नावडणार्‍या गोष्टी आजपासून आयुष्यातून काढून टाका; स्वामीकृपा होईल!

इथे कुठलीही गोष्ट शाश्वत नाही ,आपला श्वासही आपल्या हाती नाही त्यावर सत्ता आहे ती सद्गुरूंची त्यामुळे जोवर तो श्वास चालू आहे तोवर सेवा चालू ठेवणे हेच आपल्या हाती आहे. आजकाल थोड्याशा सेवेने सुद्धा आपल्याला खूप काही समजले आहे अशा अविर्भात मंडळी वावरताना पाहून खरच मनास यातना होतात ....स्वामी हे २ शब्द म्हणायची सुद्धा खरतर आपली लायकी नाही ...परंतु लायक होण्यासाठी निस्वार्थीपणे सेवा करून मिळालेल्या संधीचे सोने करणे इतकेच आपल्या हातात आहे.

स्वामींचा तारक मंत्र म्हणजे स्वमिभक्ताना स्वामिनी दिलेलं अभिवचनच आहे. नावाप्रमाणेच अत्यंत मनापासून हाक मारली तर ते आल्याशिवाय कसे राहतील...पद्मश्री सौ पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी त्यांच्या दैवी अलौकिक स्वरात गायलेला “स्वामी तारक मंत्र “ ऐकताना महाराज जणू आपल्यासमोर उभे ठाकले आहेत ही विलक्षण अनुभूती मिळते. त्यातील प्रत्येक शब्द भक्तांना “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “ ह्या वचनाची जणू ग्वाही देतो.

आपल्याला महाराजांच्या सर्व परीक्षात पास व्हायचे असेल तर “आपले महाराज फक्त एकच सद्गुरू श्री स्वामी समर्थ'' ही भावना मनात पक्की असुदे! महाराज होण्याचा अट्टाहास न करता आपण उत्तम सेवेकरी कसे होऊ, ह्याचा विचार करुया आणि त्यासाठी जन्मभर सेवेतच राहूया! महाराजांचे पट्टशिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी आपल्या “गुरुस्तवन स्तोत्रात “ म्हटले आहे, 'माझ्याकडून कायेने, वाचेने आणि मनाने जी पापे झाली असतील ती माफ करून मला क्षमा करा तारा...आपली सेवा आपल्याला ह्या जन्म मृत्यच्या फेऱ्यातून बाहेर काढील यात कुठलीही शंका नको.

२६ एप्रिल रोजी स्वामी पुण्यतिथी आहे.. आपल्याला झेपेल, रुचेल आणि रोज सहज शक्य होईल असा एखादा संकल्प मनाशी ठरवून त्याचे सातत्याने पालन करणे हीच आपल्या भक्तांची महाराजाना आदरांजली ठरेल. मला ह्या जन्मी स्वामिसेवा करण्याची संधी त्यांनी दिली ,खरच माझा जन्म कृतार्थ झाला. जे  जे झाले आहे आणि जे जे होणार आहे ते त्यांच्याच कृपेने ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्यांच्याकडे मागण्यासारखे खरच काहीच राहिले नाही इतके भरभरून त्यांनी दिले आहे. मानसिक समाधान आणि रात्रीची शांत झोप. अजून काय हवे!

सकाळी केलेली पूजा आपल्या उरलेल्या दिवसभराच्या दिनक्रमात दिसली पाहिजे .सकाळी पूजा करून आपण दिवसभरात कुणाला त्रास देत असू , ट्रेन मध्ये बसायला जागा करून न देता ४थ्या सीट वरती आपली भगिनी कशी बसणार नाही, आपल्याकडे पैसे असतानाही दुसऱ्याचे देणे द्यायचे नाही ,आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा अवमान करत असू तर आपण कितीही सेवा केली तरी त्याला अर्थ उरणार नाही....प्रत्येक मनुष्यात आपण स्वामी पाहायला शिकले पाहिजे तरच काहीतरी बदल अपेक्षित आहे. चला तर मग  अंतर्मानापासून अनन्यभावे त्यांच्या चरणी समर्पित होऊया, कारण महाराजांनीच भक्तांना आदेश दिला आहे...” सेवा करा सेवेकरी व्हा”.स्वामी समर्थ.

माझ्या आयुष्यात ज्यांनी ह्या अध्यात्मिक मार्गाचे द्वार खुले करून दिले , ज्यामुळे  आज हा अविस्मरणीय आनंद मी अनुभवते आहे , त्या माझ्या सासुबाई सौ उषाताई ह्यांना हा माझा लेख मी अर्पण करते ..

संपर्क : 8104639230

Web Title: Swami Samartha: On the occasion of Swami's death anniversary, know the orders, worship and resolutions given by Swami to his devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.