>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
गुरु ग्रह मार्गस्थ होत आहे. वक्री अवस्थेत त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा लगाम खेचून धरला होता, तो आता शिथिल होऊन आपल्या अडलेल्या सर्व कामना आणि इच्छांना गती देणार आहे. पण नुसते गुरु मार्गी झाले म्हणजे कामे होतील का? तर नाही. आपली दिनचर्या आपण पुन्हा तपासली पाहिजे. आपण आधी स्वतः मार्गी, म्हणजेच राजमार्गाने आपले जीवन व्यतीत करत आहोत का, हे पाहणे महत्त्वाचे नाही का? निश्चितच आहे.
आपली वृत्ती सदाचारी नसेल, आपण अनीतीने वागत असू, कुणाचे पैसे लुबाडणे, कुणाला त्रास देणे किंवा कुणाच्या दुःखाला कारणीभूत असणे अशा गोष्टी आपल्या हातून घडत असतील, तर गुरु मार्गी असोत की वक्री, आपल्याला शुभ फळे मिळणारच नाहीत. मार्गी होऊन सुद्धा तो ग्रह वक्री असल्यासारखीच फळे देईल, सहमत आहात ना?
गुरु आपले मन जाणतात. आपल्यात खरेपणा असेल आणि आपण प्रयत्नवादी असू, तर ते अनंत हातांनी आपल्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे आपण स्वतः कसे वागतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपली सत्कर्मे आयुष्यातील संकटे कमी करतात आणि आपली सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात एखादा कठीण काळ आला, तर लगेच गडबडून किंवा निराश व्हायचे कारण नाही. उलट अशा काळात नामस्मरण आणि साधना जितकी वाढवता येईल तितकी वाढवावी, जेणेकरून हा काळ कधी सरला, हे आपल्यालाही समजणार नाही.
आकाशातील ग्रहांचे प्रतिबिंब आपल्या प्रत्येक कर्मात उमटते आणि त्याचा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो. 'जसे कर्म तसे फळ' हे म्हटले जातेच. गुरूंचे लाडके भक्त होण्यासाठी जे जे सत्कृत्य करता येईल, ते केले पाहिजे.
आपले वागणे, बोलणे आणि नित्य आचरण शुद्ध असले पाहिजे. सन्मार्गाने, नीतीने, न्यायाने आणि धर्माचे पालन करून आपले आचरण असावे. कुंडलीत गुरु सुद्धा धर्माचे प्रतिनिधित्व करतो आणि भाग्य व मोक्ष भावात विराजमान असतो. आपले शिक्षक आणि घरातील थोर-मोठी मंडळी यांनी आपल्याला घडवले आहे; त्यांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवणे हेच खरे गुरुतत्त्व आहे. गुरु वक्री असो अथवा मार्गी, आपल्या आचरणात फरक पडता कामा नये.
प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक आपला प्रपंच चालवत असताना वक्री काय आणि मार्गी काय? आपण स्वतः 'वक्री' नसावे, हे सर्वात महत्त्वाचे. वक्री म्हणजे उधार घेणे, कुणाची निंदा-नालस्ती करणे, पैसे असूनही कुणाला मदत न करणे, सात्विक भोजन न करता मदिरापान किंवा निषिद्ध कृत्ये करणे. या गोष्टी सोडून दिल्या, तर वक्री गुरु सुद्धा मार्गी असल्यासारखाच भासू लागेल. आपले विचार शुद्ध असले पाहिजेत आणि आपली भक्ती अपेक्षाविरहित असावी. आपला संसार एकदा त्यांच्या चरणांवर अर्पण केला की, कशाचीही कमतरता उरत नाही.
सर्वात मुख्य म्हणजे कशातही वाहवत न जाणे. कशाच्या आहारी किती जायचे, हे समजले पाहिजे. 'सगळ्यात असूनही आपला रंग वेगळा', हे जमले पाहिजे आणि हे जमण्यासाठी गुरुभक्तीचा कस लागतो. आपल्या सद्गुरूंवरचा विश्वास अभेद्य हवा, मग आयुष्य कसेही असो.
गुरु मार्गी झाला म्हणजे एका रात्रीत काहीही बदलणार नाही. बदल तेव्हाच घडेल, जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवू. हे साधे-सोपे वाटले तरी कठीण आहे, पण अध्यात्म कठीणच असते. जो खरा भक्त आहे त्याला मागण्याची गरज पडत नाही; वेळ आली की ते सर्व काही देतात आणि मग घ्यायला आपली ओंजळ अपुरी पडते. आपल्या विचारांतून मार्गी-वक्रीचा गोंधळ काढून टाका आणि मनापासून त्यांची सेवा करा. आपल्याला कधी आणि काय द्यायचे, हा सर्वस्वी महाराजांचा अधिकार आहे.
कलियुग कसे असेल, याबाबत श्रीकृष्णाने आधीच करून ठेवले होते भाष्य; यातून तरणार कोण? पाहा उत्तर!
घेण्यासाठी सुद्धा आपण त्या लायकीचे असले पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण जन्म वेचावा लागतो. अखंड नामस्मरण आणि पारायण यांतून सेवा जसजशी पुढे जाते, तसे काही मागणे शिल्लक उरतच नाही. अनुभव घेऊन पहा.
एकदा मी गुरु केला तो न सोडी मलामी न सोडी कदा त्याला।
Web Summary : Guru's transit eases restrictions, but self-reflection is crucial. Righteous actions bring positive results; devotion and perseverance are key. Surrender to Swami for fulfillment.
Web Summary : गुरु का मार्गक्रमण प्रतिबंधों को कम करता है, लेकिन आत्म-चिंतन महत्वपूर्ण है। धार्मिक कार्य सकारात्मक परिणाम लाते हैं; भक्ति और दृढ़ता कुंजी हैं। स्वामी को समर्पण से पूर्ति होती है।