Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:08 IST2025-05-07T17:01:56+5:302025-05-07T17:08:07+5:30
Swami Samartha: स्वामी उपासना कशी करावी याचे धडे स्वामी चरित्रात मिळतात, स्वामींना कोणती गोष्ट आवडते याबाबत भक्ताने कथन केलेला अनुभव वाचा.

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!
स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व्हावी म्हणून भक्ती भावाने त्यांना काही न काही अर्पण करत असतो. मग ते फुल असो नाहीतर हिरेजडित हार! यथाशक्ती केलेली सेवा स्वामी चरणी रुजू होते हे आपण जाणतो. याबाबत स्वामी चरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे, कोणता ते जाणून घेऊ.
स्वामी समर्थांचा एक भक्त, जो बागायतदार होता. त्याच्या फळभागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरु होता. आपल्या बागेतली ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळ्यांचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला.
स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला. कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले. ते उपाशी असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाहीत. कापडाखाली केळ्याचा घड सावरत तो स्वामी दर्शनासाठी पोहोचला.
तिथे गेल्यावर मात्र स्वामी त्या प्रसादाचा स्वीकार करेना. त्यावेळी बागायतदार काकुळतीला येऊन म्हणाला, स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत, तुम्ही याचा स्वीकार करा.
तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, आता कशाला मला ही केळी देतोस? जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हाकलून दिलेस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस?
बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ उमगला. वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामींचे अंश होते, ते गरजवंत होते. त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला उमगले. त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला, 'माझी चूक मला कळली आहे. माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो. ज्याला गरज आहे त्याला मदत करणे ही खरी स्वामी सेवा आणि ती तुम्हाला जास्त प्रिय आहे, हे इथून पुढे लक्षात ठेवीन!'
त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण, आपण स्वामींना काय देतोय, यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय, हे पाहणे महत्त्वाचे आहे. देव भावाचा भुकेला आहे, प्रापंचिक वस्तूंचा नाही! देवाला मनोभावे अर्पण केलेलं बिल्व पत्र, तुळशी पत्र सुद्धा पुरेसं आहे. पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी!