हिंदू धर्मातील दत्त संप्रदायात श्री स्वामी समर्थ महाराजांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जाणारे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नसून ते भक्तांचे रक्षणकर्ते आणि मार्गदर्शक आहेत. आज त्यांचा प्रकट दिन, त्यानिमित्त जाणून घेऊ त्यांची अवतार कथा.
१. कर्दळी वनातील ३०० वर्षांचे गूढ आणि प्रगटीकरण
स्वामींच्या अवताराची कथा मोठी रंजक आहे. इ.स. १४५९ मध्ये गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले. तिथे त्यांनी सुमारे ३०० वर्षे कठोर तपश्चर्या केली. या दीर्घ काळात त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ रचले होते.
एके दिवशी 'उद्धव' नावाच्या लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली. त्यातून रक्ताची धार उडाली आणि एका तेजस्वी, आजानुबाहू मूर्तीचे दर्शन झाले. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज! उद्धवाला अभय देऊन स्वामींनी लोककल्याणासाठी आपले भारत भ्रमण सुरू केले.
२. भारत भ्रमण आणि संतांना दीक्षा
स्वामींनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. कलकत्त्यात महाकाली मातेचे दर्शन घेतले, काशी, प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली, असे मानले जाते. यावरून स्वामींच्या अध्यात्मिक अधिकाराची व्याप्ती लक्षात येते.
३. अक्कलकोट निवास: १८५६ ते १८७८
इसवी सन १८५६ मध्ये स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले. सुरुवातीला त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. अक्कलकोटमधील त्यांच्या २२ वर्षांच्या वास्तव्यात हे गाव एका महान तीर्थक्षेत्रात रूपांतरित झाले. स्वामींच्या सानिध्यात अनेक चमत्कार घडले:
गर्वहरण: एका विलासी चिनी दांपत्याचा अहंकार स्वामींनी मोडीत काढला.
आळवणी बुवांना जीवनदान: जगन्नाथपुरी येथे आजारी पडलेल्या आळवणी बुवांना स्वामींनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आणि त्यांना तृप्त केले.
नारायण सरोवराची किमया: पैसे मागणाऱ्या गुंडांना न जुमानता स्वामी थेट पाण्यावर बैठक मांडून बसले. ही किमया पाहून मुजोर महंत आणि गुंड स्वामींना शरण आले.
४. अवतारकार्याची समाप्ती
रविवार, ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी माध्यान्हकाली आपले अवतारकार्य पूर्ण केले. त्यांनी देह ठेवला असला तरी, "मी पुन्हा कर्दळी वनात गेलो आहे आणि आजही भक्तांच्या पाठीशी उभा आहे," ही भावना प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कायम आहे.
स्वामी समर्थांचे चरित्र हे केवळ चमत्कारांची कथा नसून ती धर्माचे सत्य स्वरूप आणि भक्तीमार्गाची शिकवण देणारी गाथा आहे. आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो.
Web Summary : Swami Samarth, an incarnation of Lord Dattatreya, appeared after 300 years of penance in Kardali forest. He traveled India, initiated saints, and resided in Akkalkot for 22 years, performing miracles and guiding devotees until his Samadhi in 1878. His presence is still felt.
Web Summary : भगवान दत्तात्रेय के अवतार स्वामी समर्थ, कर्दाली वन में 300 वर्षों की तपस्या के बाद प्रकट हुए। उन्होंने भारत यात्रा की, संतों को दीक्षा दी, और 22 वर्षों तक अक्कलकोट में रहे, चमत्कार किए और 1878 में समाधि तक भक्तों का मार्गदर्शन किया। उनकी उपस्थिति अभी भी महसूस होती है।