मुद्गल पुराणात 'अशी' आहे अंगारकी चतुर्थीची कथा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 1, 2021 17:16 IST2021-03-01T17:15:49+5:302021-03-01T17:16:39+5:30
मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने केली जाते.

मुद्गल पुराणात 'अशी' आहे अंगारकी चतुर्थीची कथा!
अंगारकी चतुर्थी अर्थात कृष्ण पक्षातील चौथा दिवस, जो दर महिन्यात येतो, त्याला आपण चतुर्थी म्हणतो. ती मंगळवारी आली की तिला 'अंगारकी चतुर्थी' म्हणतात. तो योग उद्या जुळून आलेला आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अंगारकीचे महत्त्व!
गणेश पुराण किंवा मुद्गल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते, ती अशी- अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल!
अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. जर खुद्द गणरायाने मंगळावर कृपादृष्टी केली, तर तुम्हीआम्ही त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची काहीच गरज नाही! मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल.
अंगारकी चतुर्थीला अनेक जण अन्न-पाणी ग्रहण न करता उपास करतात. दिवसभर पोटात अन्न नसल्याने, पाण्याचा थेंब नसल्याने स्वाभाविकच मनुष्य निस्तेज होतो, चिडचिडा होतो, त्याचे सात्विक भाव हरवतात, मग असा भक्त त्या सुहास्यवदनी मंगलमूर्तीला कसा बरे आवडेल? शास्त्राने आपल्याला व्रत-वैकल्याच्या निमित्ताने उपवासाची सवय लावली, ती स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी! उपासाला आध्यात्माची जोड दिली, कारण जे दोन घास सुदैवाने आपल्याला मिळतात, ते त्या ईश्वराच्या कृपेने मिळतात, ही जाणीव स्वत:च्या मनाशी ठेवण्यासाठी. अन्न किती खावे आणि कधी खावे हे कळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी उपासाचे प्रयोजन केले होते. त्याला वैज्ञानिक भाषेत आपण `लंघन' असेही म्हणतो. उपासाच्या निमित्ताने फलाहार, दूध, फळांचा रस असा सात्विक आहार घेणे अपेक्षित असते. मात्र, आपण उपासाच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी, वेफर्स, चिक्की इ. पदार्थ उपासाला चालतात, असे म्हणून स्वत:चीच फसवणूक करतो. उपास हा देवासाठी नसून तो देहासाठी असतो! त्याला अध्यात्माची जोड असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. दिवसभर केलेला उपास रात्री सोडताना मोदकाचा पहिला घास आपल्याही चेहऱ्यावर `मोद' म्हणजेच आनंद आणतो.
सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या गणपतीने दूर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व ओळखून त्यांना जवळ केले. अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो. त्यांचे महत्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो. अथर्वशीर्षात गणेशस्तुती केलेली असली, तरी त्याचे पारायण केल्यामुळे आपली भाषाशुद्धी होते. भाषा शुद्ध झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात. मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि कामांनाही गती येते. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या चतुर्थीने साध्य होतात, म्हणून तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे!