Somavati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला 'या' मंत्राचा विशेष जप करा आणि महादेवाची कृपा प्राप्त करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:52 IST2022-05-30T14:51:23+5:302022-05-30T14:52:02+5:30
Somavati Amavasya 2022: मृत्यूचे भय, चिंता, अनाकलनीय भीती, दुर्धर आजार या सर्वांवर महादेवाचा मंत्र अतिशय उपयुक्त ठरतो!

Somavati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला 'या' मंत्राचा विशेष जप करा आणि महादेवाची कृपा प्राप्त करा!
आज सोमवती अमावस्या, शनी जयंती आणि सर्व सिद्धी योग आहे. शनी महाराज हे प्रखर शिव भक्त आहेत. त्यामुळे शनी महाराज व भोलेनाथ यांची कृपा प्राप्त करण्यासाठी करा महामृत्युंजय जप. या जपामुळे होणारे फायदे लक्षात घ्या, त्याच बरोबर हा जप म्हणत असताना पुढे दिलेल्या चुका प्रकर्षाने टाळा.
घरात आणि विशेषतः मनात सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार केले जातात. मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते. मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही, तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येते.
महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोच्चारण करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे, की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो, ते या सृष्टीचे संरक्षण करतात. आमचे जीवन समृद्ध करतात, एवढेच नाही, तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात.
हा मंत्र रोगांपासून संरक्षण करतो
रोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरीत्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करावा. आज सोमवती अमावस्या असल्याने आज विशेष रूपाने या मंत्राचे उच्चारण लाभदायी ठरेल.
हा मंत्र अकाली मृत्यूपासून बचाव करतो
भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते.
भीती दूर करून मनाला शांत करतो
आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दररोज १०८ वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती दूर होते.
महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे नियम
महमृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा. कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षच्या जप्याने जप करावा कारण असंख्य जपाचे फळ मिळत नाही. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा. जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करा.