Som Pradosh 2025: ज्यांना आयुष्यात सर्वार्थाने भरभराट हवी, त्यांनी आज करा सोमप्रदोष व्रत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 07:05 IST2025-06-23T07:00:00+5:302025-06-23T07:05:01+5:30
Som Pradosh Vrat 2025 Puja Vidhi: आज सोम प्रदोष आहे, त्यानिमित्त सूर्यास्ताच्या वेळी केले जाते व्रताचरण, ज्यामुळे नशिबाची साथ मिळते आणि आयुष्यात प्रगती होते.

Som Pradosh 2025: ज्यांना आयुष्यात सर्वार्थाने भरभराट हवी, त्यांनी आज करा सोमप्रदोष व्रत!
Importance of Som Pradosh Vrat: प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. आज २३ जून रोजी सोमवारी प्रदोष(Som Pradosh 2025) येत असल्याने तिला सोम प्रदोष म्हटले जाईल. ही शिव उपासकांसाठी संधी आहे. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) सूर्यास्ताच्या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते.
प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. सोमवारी आगमन झाल्यामुळे त्याला सोम प्रदोष म्हणतात. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. सोम प्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही सोम प्रदोषाच्या दिवशी उपास करुन पूजा करावी व संध्याकाळी फळे व दुधाचा नैवेद्य दाखवून उपास सोडावा.
सोम प्रदोषामागे आणखीही एक व्रत कथा सांगितली जाते-
एक विधवा स्त्री स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यासाठी दारोदार भीक मागत असे. मिळालेल्या अन्नातून दोघांचे पोषण होत असे. एक दिवस भीक मागत फिरत असताना तिला जखमी अवस्थेत एक मुलगा सापडला. तिला त्या मुलाची दया आली. तिने त्याला आपल्या सोबत झोपडीत नेले. त्यालाही घासातला घास खाऊ घातला. तो मुलगा बरा झाला. त्याने स्वतःची ओळख पटवून दिली. तो एका राज्याचा राजकुमार होता. परंतु शत्रूने त्याच्या राज्यावर आक्रमण करून त्याच्या वडिलांना बंदिवान केले होते. आणि त्याला राज्यातून हाकलून दिले होते. म्हणून त्याची दुरावस्था झाली होती.
दिवस पुढे पुढे जात होते. एकदा एका गंधर्व कन्येचा राजकुमाराशी परिचय झाला आणि ती त्याच्या रूपावर लुब्ध झाली. त्याच्याशी लग्न करण्याचा तिने मनोदय व्यक्त केला. तिने आपल्या माता पित्याला तसे सांगितले. त्याची पूर्ण चौकशी करून गंधर्व कन्येच्या माता पित्याने आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. आपले सैन्य राजपुत्राला देऊन शत्रूशी लढा करण्याचे बळ दिले. राजकुमाराने आपले राज्य परत मिळवले. आई वडिलांची तुरुंगातून सुटका केली आणि ज्या स्त्रीने त्याला मदतीचा हात दिला होता, त्या स्त्रीचा राजपुत्राने सांभाळ केला आणि तिच्या मुलाला भविष्यात राज्यच्या प्रधान पद बहाल केले. ती स्त्री कायम प्रदोष व्रत भक्ती भावाने करत असल्यामुळे तिचे दिवस पालटले आणि नशिबात अनपेक्षितपणे राजयोग आला.
सोम प्रदोष व्रतासाठी पूजेसाठी शुभ वेळ - २३ जून रोजी संध्याकाळी ६.४५ पासून ७. ३४ पर्यंत.
प्रदोष पूजा विधी : या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावे. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचेही पठण करावे.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।
उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।