Som Pradosh 2025: यंदाचे सोम प्रदोष व्रत चुकवू नका, एका व्रतामध्ये मिळणार तीन व्रताचरणाचा लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:38 IST2025-01-25T16:37:23+5:302025-01-25T16:38:15+5:30
Som Pradosh 2025: सोम प्रदोष काळात होत आहे दुर्मिळ संयोग, ज्यामुळे तीन व्रतांचे पुण्य एका व्रताचरणाने प्राप्त करता येईल; सविस्तर जाणून घेऊ.

Som Pradosh 2025: यंदाचे सोम प्रदोष व्रत चुकवू नका, एका व्रतामध्ये मिळणार तीन व्रताचरणाचा लाभ!
जानेवारी महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत सोमवारी आहे, त्यामुळे ते सोम प्रदोष व्रत म्हटलेजाईल. सोमवार २७ जानेवारी रोजी हे सोम प्रदोष व्रत (Som Pradosh 2025) करायचे आहे. अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पौष मासातील या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. कारण यावेळी प्रदोष व्रत अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रदोष व्रताचे महत्त्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त.
यंदा सोम प्रदोष व्रत केल्याने मिळणार तीन व्रतांचा लाभ : (Benefits of Som Pradosh vrat 2025)
यावेळी प्रदोष व्रत करणाऱ्यांना एकाच वेळी दोन उपवासाचा लाभ मिळणार आहे. त्रयोदशीनंतर चतुर्दशी तिथी २७ जानेवारी रोजी रात्री ८.३५ सुरु होणार आहे. त्यामुळे या दिवशी उपवास करावा. जेणेकरून चतुर्दशीच्या उपासाचाही लाभ मिळेल. कारण, त्रयोदशीनंतर जेव्हा चतुर्दशी मध्यरात्री येते तेव्हा या दिवशी शिवरात्रीचे व्रत केल्यास लाभ होतो असा शास्त्रात नियम आहे. यंदा तसाच योग्य जुळून येत आहे. त्यामुळे भाविकांनाही शिवरात्री व्रताची लाभ मिळेल. हा योग महाशिवरात्रीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. परंतु जे केवळ चतुर्दशीचे व्रत करतात त्यांनी २८ जानेवारीचा उपवास करावा कारण या दिवशी चतुर्दशी तिथी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते. ही चतुर्दशी नरक निवारण चतुर्दशी अर्थात मोक्षदायिनी चतुर्दशी म्हणूनही ओळखली जाते.
व्रत लाभ :
सोम प्रदोष व्रत केल्याने शिव शंकराची कृपा होऊन सांसारिक त्रासातून सुटका होते. कुंडली दोषाचे निवारण होते. वास्तू दोष दूर होतात तसेच हित शत्रूंचा बिमोड होऊन आपल्या यशाचा मार्ग निष्कंटक होतो. त्यासाठी महादेवाची उपासना कधी व कशी करायची तेही जाणून घेऊ.
सोम प्रदोष व्रत शुभ मुहूर्त :
प्रदोष काळासाठी गोरज मुहूर्त अर्थात गायींचा गोठ्यात परतण्याचा मुहूर्त गृहीत धरला जातो. ही वेळ साधारण सूर्यास्तानंतर असते. सूर्यास्तापासून पुढील तासभर व्रताचरण करून आणि नंतर उपास सोडून हे व्रत पूर्ण केले जाते.
सोम प्रदोष व्रत उपासना पद्धत :
>> या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे.
>> यानंतर भगवान भोलेनाथाचे ध्यान करून प्रदोष व्रताचा संकल्प करावा.
>> यानंतर, मंदिरात अथवा घरच्या देव्हाऱ्याची स्वच्छता करावी.
>> महादेवाला पंचामृत अथवा दूध पाण्याचा अभिषेक घालावा. नंतर भस्मलेपन करावे. बेलपत्र आणि पांढरे फुल वाहावे.
>> धूप, दीप लावून महादेवाची उपासना म्हणून शिवस्तुती अथवा शिवमंत्राचा जप करावा.
>> शंकराची आरती करून व्रताचरण पूर्ण करावे.
>> आपल्या अडी अडचणी देवाला सांगून, हातून कळत-नकळत घडलेल्या पापांची क्षमा मागावी आणि सेवा रुजू करावी.