भारत पाकिस्तानची स्थिती पाहता मोदींच्या निर्णयाबाबत श्री.श्री. रविशंकर यांनी केले मोठे विधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:49 IST2025-05-10T14:48:02+5:302025-05-10T14:49:33+5:30
साधू, संत, गुरु परंपरेतले लोक मुख्यत्त्वे अहिंसेचा मार्ग निवडा असे सांगतात, मात्र सध्याची भारत पाक स्थिती पाहता रविशंकर आक्रमक होत म्हणाले...

भारत पाकिस्तानची स्थिती पाहता मोदींच्या निर्णयाबाबत श्री.श्री. रविशंकर यांनी केले मोठे विधान!
ऑपरेशन सिंदूरचा(Opreation Sindoor) पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात घोळत असतानाच भारतीय लष्कराने आक्रमक होत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक ते आपली मोहीम राबवत आहेत. पाकिस्तानतून त्यावर प्रत्युत्तर मिळत आहे. सोशल मीडियावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपला पाठिंबा दर्शवत आहेत, सैन्याला प्रोत्साहन देत आहेत. अशातच अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री. श्री. रविशंकर यांनीदेखील मोठे विधान केले आहे.
श्री. श्री. रविशंकर म्हणाले, 'आतंकवाद मानवतेच्या विरोधी आहे. आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी भारताने उचललेले पाऊल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपले देवी देवता सुद्धा सशस्त्र आहेत. कारण ज्यांना सरळ सांगून ज्या गोष्टी कळत नाहीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यावे लागते. भारताने अतिशय विवेकपूर्ण पाऊल उचलत नागरी वस्तीवर हल्ला न करता दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे. जे योग्य आहे. देश विदेशात राहणारे भारतीय लोक काळजीत आहेत, पण त्यांनी निर्धास्त राहावे. कारण पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्कराने योग्य पाऊल उचलले आहे. ईश्वर आपल्या पाठीशी आहे, तो आपल्याला पूर्ण साथ देईल. तुम्हीदेखील प्रार्थना करा आणि निश्चिन्त व्हा.'
संत अहिंसेचा मार्ग सांगतात पण जशास तसे वागावे ही शिकवणही देतात. तुकोबा तर म्हणतात,
विंचू देव्हाऱ्यासी आला, न लगे पूजा भक्ती त्याला,
तेथे पैजाऱ्याचे काम, अधमासी तो अधम!
अर्थात विंचू देव्हाऱ्यात जाऊन बसला म्हणजे तो पूजनीय होत नाही. कारण डंख मारणं हा गुणधर्म तो सोडत नाही. त्याला वेळीच ठेचावे लागते. दहशतवादी वृत्ती सुद्धा अशाच विंचवासारखी आहे, सोडून दिली तर ती डंख मारत राहणार, म्हणून भारताने उचललेले पाऊल उचित आहे आणि त्याबद्दल श्री श्री रविशंकर यांनी मोदींचे अभिनंदन करत ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शवला आहे!