“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:40 IST2025-01-28T17:37:40+5:302025-01-28T17:40:31+5:30
Ayodhya Ram Mandir: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जात आहेत. गेल्या ३० तासांत जवळपास २५ लाख भाविक, पर्यटक अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील भव्य राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. २०२५ची सुरुवात झाल्यापासून तर भाविकांचा आणि पर्यटकांचा महासागर अयोध्येत लोटला आहे. एकीकडे १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले साधु-संत-महंत तसेच भाविक, पर्यटक अयोध्येला जाऊन रामलला चरणी नतमस्तक होत आहेत. गेल्या ३० तासांत २५ लाख भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये २०२५ च्या महाकुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी देश-विदेशातील भाविक येत आहेत. हेच भाविक पुढे अयोध्येतील राम मंदिर, काशीत जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेत आहेत. यामुळे अयोध्येत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आहे. याच कारणास्तव आता रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रमुख चंपत राय यांनी भाविकांना आदरयुक्त विनंती केली आहे.
कृपा करा अन् किमान १०-१५ अयोध्येत येऊ नका
अयोध्ये लगतच्या परिसरात असलेल्या भाविकांनी कृपा करून पुढील किमान १० ते १५ दिवस अयोध्येत येऊ नये. कारण देशातील अन्य भागातून तसेच परदेशातून आलेल्या भाविक, पर्यटकांना रामललाचे दर्शन होऊ शकेल. आमचे निवेदन आहे की, अयोध्या लगतच भाविकांनी १० ते १५ दिवसांनी रामललाचे दर्शन घेण्यासाठी यावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूती तीर्थक्षेत्र न्यासाचे प्रमुख चंपत राय यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात चंपत राय यांनी हे निवेदन केले आहे. मौनी अमावस्येचे मुख्य स्नान २९ जानेवारी रोजी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आहे. २९ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुमारे १० कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज आहे. प्रयागराजहून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. प्रयागहून अयोध्येला भाविक रेल्वे आणि रस्ते दोन्ही मार्गांनी येत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ
गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. अयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता, एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने भक्तांना रामललाचे दर्शन घेणे खूप कठीण आहे. त्यामुळे भक्तांना अडचणी येत आहेत. परिणामी, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी, व्यवस्थांमध्ये योग्य बदल करणे आवश्यक झाले आहे. भाविकांना जास्त चालावे लागत आहे. आम्ही जवळच्या भागातील भाविकांना १५-२० दिवसांनी अयोध्येला भेट देण्याची विनंती करतो. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना रामललाचे दर्शन सोयीस्करपणे घेता येईल. हे सर्वांसाठी सोयीचे असेल. वसंत पंचमीनंतर फेब्रुवारी महिन्यात गर्दी कमी होऊ शकेल आणि हवामानही चांगले होईल. त्या वेळेसाठी जवळच्या भाविकांनी अयोध्येत येण्याचा कार्यक्रम आखला तर चांगले होईल. कृपया या विनंतीचा विचार करा, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.
आदरणीय भक्तजन,
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 28, 2025
जय श्री राम!
प्रयागराज में दिनांक 29 जनवरी को कुम्भ में मौनी अमावस्या का मुख्य स्नान है। अनुमान है कि लगभग 10 करोड श्रद्धालु दिनांक 29 जनवरी को प्रयागराज में स्नान करेंगे। बहुत बड़ी संख्या में प्रयागराज से भक्तजन अयोध्या जी पहुंच रहे हैं। ट्रेन एवं सड़क दोनों…